गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाची कारवाई
पणजी : टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली मडगावातील एका महिलेची तब्बल ₹२ कोटी ६० लाखांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी सायबर गुन्हे विभागाने रिजास के. (३६, रा. केरळ) याला अटक केली असून, त्याच्या बँक खात्यात ७५ लाख रुपये जमा झाल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी आके-मडगाव येथील पीडित महिलेने ९ जून रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिघा अज्ञातांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(३) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
अशी झाली फसवणूक
२० मे ते २ जूनदरम्यान, एका व्यक्तीने TRAI अधिकारी असल्याचे भासवून सदर महिलेशी संपर्क केला. तिच्या आधार कार्डाचा वापर मनी लाँड्रिंगसाठी झाला असून, ती सध्या चौकशीखाली असल्याचे सांगण्यात आले. नंतर दुसऱ्या एका व्यक्तीने सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले आणि तिला सर्वोच्च न्यायालयाचे बनावट वॉरंट पाठवले. प्रकरण मिटवण्यासाठी विविध बँक खात्यांमध्ये रक्कम भरण्यास भाग पाडले गेले. यानंतर घाबरलेली पीडित महिलेने २.६० कोटींची रक्कम विविध बँक खात्यांत ट्रान्सफर केली. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता असून, सायबर गुन्हे विभागाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अशा बनावट कॉल्सना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.