‘विद्या लक्ष्मी’ शिष्यवृत्तीच्या उत्पन्नमर्यादेत वाढ

शिष्यवृत्तीची रक्कम ५ हजारांवरून ३० हजार रुपये

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th June, 12:45 am
‘विद्या लक्ष्मी’ शिष्यवृत्तीच्या उत्पन्नमर्यादेत वाढ


पणजी :
आदिवासी कल्याण खात्यातर्फे एसटी समाजातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसाठी त्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी योजनेचा लाभ घेण्यासाठी एसटी समाजातील विद्यार्थिनीच्या संपूर्ण कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ३ लाख रुपये होती. आता ती वाढवून वार्षिक ५ लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रक्कम ५ हजार रुपयांनी वाढवून ३० हजार रुपये करण्यात आली आहे.
योजनेसाठी २०२३-२४ मध्ये किंवा त्यापूर्वी दहावी उत्तीर्ण झालेली एसटी समाजातील विद्यार्थिनी अर्ज करू शकते. विद्यार्थिनी बारावी तीनपेक्षा कमी प्रयत्नांत उत्तीर्ण झाली असणे आवश्यक आहे. अथवा दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला असणे आवश्यक आहे. अर्जांची छाननी करून पात्र विद्यार्थिनींच्या बँक खात्यात थेट ३० हजार रुपये जमा करण्यात येतील. इच्छुकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे. यासोबत जात प्रमाणपत्र, दहावी व बारावीचे गुणपत्रक, आधार कार्ड आणि उत्पन्न प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी खात्याने पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. खात्याचे संचालक सदस्य सचिव उत्तर सचिव अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. ही योजना पुढील पाच वर्षांसाठी सुरू राहणार आहे. ही योजना एसटी समाजातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, त्यांना आर्थिक मदत देणे यासाठी सुरू करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मागील पाच आर्थिक वर्षांत राज्यातील ३८५६ विद्यार्थिनींनी या योजनेचा फायदा घेतला आहे. यादरम्यान सरकारने या योजनेवर सुमारे १० कोटी रुपये खर्च केला आहे.