राज्यातील पक्ष्यांच्या ९ प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर

१४ प्रजाती धोक्यात : ३० प्रजाती धोक्यात येण्याच्या मार्गावर, किटकांच्या ३, फुलपाखरांच्या ६ प्रजातींचेही संरक्षण आवश्यक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th June, 12:44 am
राज्यातील पक्ष्यांच्या ९ प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर

पणजी : वातावरणीय बदल, निसर्गातील वाढता मानवी हस्तक्षेप, अधिवास नष्ट होणे अशा विविध कारणांमुळे गोव्यात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या काही प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या निकषांनुसार (आययूसीएन) गोव्यात आढळून येणाऱ्या पक्ष्यांच्या ९ प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय १४ प्रजाती धोक्यात असून ३० प्रजाती धोक्यात जाण्याच्या मार्गावर आहेत. गोवा जैव विविधता मंडळाच्या धोरण आणि कृती योजना २०२५-२०३०च्या मसुदा आराखड्यातून ही माहिती मिळाली आहे.
मसुदा आराखडा बनवताना गोव्यात आढळून येणाऱ्या ४८६ पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती. यानुसार लेसर फ्लोरिकन, व्हाईट रम्पड व्हलचर, इंडियन व्हलचर आणि यलो ब्रेस्टेड बंटिंग हे चार पक्षी लुप्त होण्याच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. ग्रेट नॉट, ब्लॅक बेलिड टर्न, इंडियन स्किमर, इजिप्शियन व्हल्चर आणि स्टेपे ईगल हे पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. अस्तित्व धोक्यात असणाऱ्या एकूण ५३ पक्षांपैकी काही दुर्मिळ आहेत, तर काही पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ पक्षी आहेत. याशिवाय ड्रॅगन फ्लाय या किटकांच्या ३, तर फुलपाखरांच्या ६ प्रजातींचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे आययूसीएनने नमूद केले आहे.
मसुदा आरखड्यानुसार आययूसीएनने गोव्यातील १० पक्ष्यांच्या प्रजातींचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अधिवास नष्ट होणे, खाजन व्यवस्थापन योग्य पद्धतीने न करणे, पाणथळ जागांचे व्यवस्थापन न करणे, मोठी झाडे कमी होणे अशा विविध कारणांमुळे या पक्ष्यांची संख्या कमी झाल्याचे आययूसीएनने म्हंटले आहे. मंडळाने राज्यातील पक्ष्यांच्या माहितीची आढावा घेणे, कमी झालेल्या पक्ष्यांसाठी उपाययोजना सुचवण्यासाठी ८ सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने धोरण आणि कृती योजना सुचवल्या आहेत.

अधिक अभ्यास होणे आवश्यक
समितीने राज्यातील पक्षी, फुलपाखरू व अन्य किटकांचा अधिक अभ्यास होणे आवश्यक असल्याचे मत नोंदवले आहे. शहरी भागात हरित जागा असणे, पठारांचा अभ्यास करणे, स्थानिक नसलेल्या सजीव प्रजातींचा अभ्यास करणे, या प्रक्रियेत सामान्य जनतेची मदत घेणे अशा विविध उपाययोजना करण्याची शिफारस समितीने केली आहे.

समितीच्या अन्य शिफारसी
- राज्यात पक्षी संवर्धन कृती दलाची स्थापना करणे.
- जैविक शेतीला प्रोत्साहन देऊन रसायनांचा वापर कमी करणे.
- पक्षी संवर्धनाठी स्थानिक पातळीवर कार्यशाळा आयोजित करणे.
- शालेय शिक्षणात स्थानिक पक्षी आणि त्यांचे महत्त्व सांगणारा उपक्रम राबवणे.