कर्नाटक : हाय वोल्टेज विजेच्या तारांना स्पर्श होऊन अंबिकानगर जंगलात हत्तीचा दुर्दैवी मृत्यू

जंगलातून जाणाऱ्या उच्चदाबाच्या वीजवाहिन्या वन्यजीवांसाठी ठरताहेत कर्दनकाळ!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th June, 01:29 pm
कर्नाटक : हाय वोल्टेज विजेच्या तारांना स्पर्श होऊन अंबिकानगर जंगलात हत्तीचा दुर्दैवी मृत्यू

दांडेली  : काळी व्याघ्र प्रकल्पाच्या अंबिकानगर वनक्षेत्रात एका हत्तीचा उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी १७ जून रोजी घडली. अंबिकानगर–कुळघी रस्त्यालगत घडलेल्या या घटनेने वन्यप्रेमी हवालदिल झाले आहेत.  या परिसरात वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात हालचाल असते. 

प्राथमिक माहितीनुसार, हा हत्ती एका झाडाची पाने खात असताना बाजूलाच असलेल्या कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड (KPTCL) च्या २२० के.व्ही.च्या  उच्चदाबाच्या  वीजवाहिनीला स्पर्श झाला आणि तात्काळ त्याचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक (ACF) एम.एस. कलीमठ यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एका पशुवैद्यकीय पथकाने हत्तीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले. त्या ठिकाणीच अंत्यसंस्कार त्याचे अंत्य संस्कार. 

या घटनेमुळे जंगलातून जाणाऱ्या उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे वन्यजीवांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अंबिकानगर आणि जोयडा तालुक्यातील अनेक भागांतून अशा प्रकारच्या वीजवाहिन्या जात असून, त्या वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक मार्गांवर अडथळा ठरत आहेत.

या प्रकरणात वन विभागाने चौकशी सुरू केली असून, पूर्ण अहवाल तयार करून अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवण्याची शक्यता आहे. पूर्वीही अशा प्रकारच्या घटनांमध्ये माकड, बिबटे, पक्षी अशा वन्यजीवांचा जीव गेला आहे. मात्र यंत्रणा सुधारण्याबाबत पुरेशी पावले उचलली गेली नाहीत, असा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

वन्यजीव संरक्षण तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अशा वीजवाहिन्यांना सुरक्षित संरक्षक कवच द्यावे, त्यांची उंची वाढवावी आणि वन्य प्राण्यांच्या मार्गातून त्या हटवाव्यात, अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर वीज वितरण आणि वन्यजीव संरक्षण यामधील समतोल राखण्याची गरज अधोरेखित झाली असून, वनखात्याने आणि वीजप्राधिकरणाने तातडीने जबाबदारी स्वीकारून ठोस पावले उचलण्याची मागणी सर्वत्र होत आहे.



हेही वाचा