९३ वर्षांचे आजोबा, पत्नीसाठी सोन्याच्या माळेची खरेदी आणि तो व्हायरल व्हिडीओ, पहा काय घडलं...

सोनं विकणाऱ्या दुकानातली माणुसकीची कहाणी, युजर्स म्हणताहेत ‘हा व्यवहार अमूल्य होता!’

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
19th June, 01:11 pm
९३ वर्षांचे आजोबा, पत्नीसाठी सोन्याच्या माळेची खरेदी आणि तो व्हायरल व्हिडीओ, पहा काय घडलं...

औरंगाबादः काही प्रेमकथा वयाच्या बंधनात अडकत नाहीत. ९३ वर्ष पार केलेले एक आजोबा, डोळ्यांत आपल्या आजीबद्दल अपार प्रेम घेऊन, तिच्यासाठी दागिना शोधत औरंगाबादच्या औरंगपुरामधल्या रस्त्यावर फिरत होते. हातात फक्त काही पैसे, पण हृदयात मोठं स्वप्न. आपल्या अर्धांगिनीला हसताना पाहायचं! कुणी अवहेलना केली, कुणी हसलं तर कुणी प्रेमाने मोल ओळखलं. सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या त्या व्हिडीओवर प्रचंड मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा पाऊस पडतोय. आजोबांची ही गोष्ट फक्त दागिन्यांची नाही, तर माणुसकी, प्रेम आणि तळमळीची आहे.


त्या व्हायरल व्हिडीओ बाबत मिळालेल्या माहितीनुसार ९३ वर्षांचे आजोबा बायकोसाठी दागिना आणि मंगळसूत्राच्या वाट्या खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या औरंगपुरा रस्त्यावर फिरत होते. जेव्हा ते पहिल्या ज्वेलर्सच्या दुकानात शिरले, तेव्हा त्यांना भिकारी समजून दुकानदाराने दारातूनच हातात १ रुपया टेकवून तिथून हाकलून लावले. नंतर दोन दुकानात आजीला काहीच न आवडल्याने ते तसेच माघारी फिरले. पुढे गोपिका ज्वेलर्सच्या दुकानात त्यांनी माळ आणि माळेत गुंफण्याची वाटी घेतली. त्या दोघांचे प्रेम आणि गरिबीतही आपल्या पत्नीसाठी काहीतरी घ्यायचंय ही त्या आजोबांची तळमळ ज्वेलर्सचे मालक नीलेश खिंवसरा यांनी पाहिली. त्यांच्याजवळ जात खिंवसरा यांनी त्यांची चौकशी केली. जेव्हा गोष्ट पैसे देण्याची आली, तेव्हा त्या जोडप्याने त्यांच्याकडच्या ११२० रुपयांच्या नोटा आणि कपड्यात बांधून आणलेली चिल्लर खिंवसरा यांना दाखवली. 


पैसे घेताना मात्र दुकान मालक नीलेश खिंवसरा यांनी त्यांची परिस्थिती ओळखून आणि सद्ह्रदयता दाखवून माळेची मूळ किंमत बाजूला सारून केवळ २० रुपये आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. हा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. खिंवसरा यांनी त्यांच्या परीने या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर हसू खुलवल्याने सगळेजण दुकान मालकाचं कौतुक करत आहेत.


घरची बिकट परिस्थिती
त्या आजोबांनी खिंवसरा यांना दिलेल्या माहितीनुसार त्यांचे वय ९३ वर्ष असून आजी ८० वर्षांच्या आहेत. त्यांचा एक मुलगा हयात नाही तर दुसरा मुलगा व्यसन करत असल्यामुळे त्यांनी राहतं घर सोडले आहे.

चेहऱ्यावर हसू महत्त्वाचं होतं

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काहीजणांनी ते सोन्याचे दागिने नव्हते अशी टीका केली आहे. या बाबत अद्याप स्पष्टता झाली नाही. खरं तो दागिना खरा किंवा खोटा आहे हे महत्त्वाचं नव्हतं तर खिंवसरा यांनी त्यांच्या परीने या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर जे हसू खुलवलं, ते महत्त्वाचं होतं. जगात सोनं महाग असतं, पण खरं प्रेम त्याहूनही अमूल्य असतं. गोपिका ज्वेलर्समधला तो क्षण सोन्यासारखा शुद्ध होता, असंच म्हणावं लागेल. 

हेही वाचा