पश्चिम घाटात पावसाचा जोर कायम
जोयडा : बेळगाव- गोवा राष्ट्रीय महामार्गांवर अनमोड घाटात आज पहाटे झाड पडल्याने पाच तास वाहतूक टप्प झाली होती. मात्र वन अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी अखेर पाच तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. पश्चिम घाटात पावसाचा जोर कायम असून त्यामुळे पडझड वाढली आहे. अनमोड घाटात अनेक ठिकाणी लहान लहान दरड कोसळण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.
मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास अनमोड अबकारी चेक नाक्यापासून १ किलोमीटरच्या अंतरावर भले मोठे झाड कोसळले. या घटनेने अनमोड घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. झाड रस्त्याच्या मधोमध पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनमोड वन अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत झाड हटवून वाहतूक सुरू केली.
सध्या गोव्यासह बेळगांव, सिंधुदुर्गात पावसाचा जोर असून मार्गावरही दिवस- रात्र पाऊस चालू आहे. दररोज छोटी-मोठी झाडे पडण्याच्या घटना घडत आहेत. तसेच काही धोकादायक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.