तेहरानमध्ये इस्रायलचे हवाई हल्ले : इराणचे गुप्तचर प्रमुख आणि उपप्रमुख ठार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th June, 12:03 pm
तेहरानमध्ये इस्रायलचे हवाई हल्ले : इराणचे गुप्तचर प्रमुख आणि उपप्रमुख ठार

तेहरान : इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे गुप्तचर विभागप्रमुख ब्रिगेडियर जनरल मोहम्मद काझमी आणि त्यांचे उपप्रमुख जनरल हसन मोहकिक यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) च्या कमांड संरचनेला मोठा धक्का बसला आहे.



इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत या कारवाईची कबुली दिली. इस्रायलने त्यांच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखाला आणि उपप्रमुखाला ठार केले आहे, असे नेतान्याहूंनी म्हटले. इराणच्या अधिकृत आयआरएनए वृत्तसंस्थेनेही या वृत्ताला दुजोरा आहे. 



इस्रायलच्या ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत शुक्रवारी सकाळपासून इराणच्या गुप्तचर आणि अणु कार्यक्रमांच्या केंद्रांवर लक्ष केंद्रित करून सुरू करण्यात आलेल्या हवाई कारवाया सुरूच आहेत. इराणकडून यास प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस III’ अंतर्गत इस्रायलवर डझनभर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून हजारोंवर जखमी आहेत. गेल्या तीन दिवसांपासून इस्रायल आणि इराणदरम्यान प्रत्यक्ष युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे.



गेल्या काही दिवसांपूर्वी इराणचे सशस्त्र दलांचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल मोहम्मद बागेरी आणि आयआरजीसी  प्रमुख जनरल होसैन सलामी यांनाही इस्रायलच्या कारवाईत लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. ही स्थिती इराण-इस्रायल संघर्षाचा नवा आणि अधिक धोकादायक अध्याय उघडत असल्याचे स्पष्ट होत आहे. दोन्ही देशांनी अधिक तीव्र हल्ल्यांची इशारा दिल्याने पश्चिम आशियात युद्धजन्य तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा