नायजेरियात पाण्यावरून वाद; अनेकांना घरात कोंडून जिवंत जाळले

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th June, 10:52 am
नायजेरियात पाण्यावरून वाद; अनेकांना घरात कोंडून जिवंत जाळले

अबुजा : नायजेरियाच्या उत्तर-मध्य भागातील बेन्यू राज्यातील येलेवाटा गावात शुक्रवारी रात्री उशिरा ते शनिवारी सकाळपर्यंत झालेल्या भीषण हल्ल्यात किमान १०० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल नायजेरियाने दिली आहे. या हिंसाचारात शेकडो लोक जखमी झाले असून, अनेक अद्याप बेपत्ता आहेत.


Image


हल्लेखोरांनी अनेक कुटुंबांना त्यांच्या घरात कोंडून त्यांना जिवंत जाळल्याचे अ‍ॅम्नेस्टीने स्पष्ट केले.  बेन्यू पोलिसांनी हल्ल्याची पुष्टी केली असून, मृतांची नेमकी संख्या आणि हल्लेखोर कोण होते, याचा तपास सुरू असल्याचे सांगितले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या १०० हून अधिक असण्याची शक्यता आहे.

जल व जमीन हक्कांवरून संघर्ष

नायजेरियाच्या मध्यवर्ती पट्ट्यात असलेल्या बेन्यू राज्यात मुस्लिम गुराखी आणि ख्रिश्चन शेतकऱ्यांमध्ये जमिनी आणि पाण्याच्या वापरावरून सतत संघर्ष होत असतो. गुरांकरता चराईसाठी जमीन आणि शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी लागणाऱ्या जमिनीवरून निर्माण होणारे हे वाद हळूहळू जातीय व धार्मिक संघर्षात रूपांतरित होत आहेत.



मागील महिन्यातच बेन्यू राज्यातील ग्वेर वेस्ट भागात अशाच प्रकारच्या हल्ल्यात २० लोकांचा मृत्यू झाला होता, तर एप्रिलमध्ये शेजारील प्लेटू राज्यात ४० जणांना जीव गमवावा लागला होता. राज्याचे मुख्यमंत्री हायासिंथ आलिया यांनी हल्लाग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी एक प्रतिनिधीमंडळ घटनास्थळी पाठवले आहे. दरम्यान, या घटनेचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत, ज्यात जळालेली घरे व मृतदेह स्पष्ट दिसत आहेत.

हेही वाचा