महाराष्ट्र शासनाचा आदेश जारी; विठ्ठलाच्या दर्शन घेण्यासाठी आजपासून टोकन व्यवस्थाही सुरू. वाचा सविस्तर.
सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या ११०९ दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतके अनुदान देण्यास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या या दिंड्यांसाठी एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा निर्णयही जारी करण्यात आला आहे.
मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २०२४ च्या आषाढी वारीसाठी अशाच प्रकारे अनुदान देण्यात आले होते. त्याच निर्णयाची पुनरावृत्ती करत महाराष्ट्र राज्य सरकारने यंदाही हे अनुदान मंजूर केले आहे. विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या ११०९ दिंड्यांची यादी शासनाकडे देण्यात आली होती, त्याआधारे हे वितरण होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने 'चरणसेवा' हा आरोग्यविषयक उपक्रम हाती घेतला आहे. नाशिक, जालना, सातारा, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांतून प्रस्थान करणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत. ४३ मुक्कामाच्या ठिकाणी सुसज्ज वैद्यकीय तपासणी केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. दिंडी मार्गावरील आरोग्य सेवा ही स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून दिली जात आहे.
आषाढी वारीचा मुख्य सोहळा ६ जुलै रोजी पार पडणार असून, वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य पोलीस यंत्रणा पूर्ण सज्ज आहे. ६००० पोलीस कर्मचारी, ३२०० होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या ६ तुकड्यांची तैनाती करण्यात आली आहे. संपूर्ण मार्गावर ड्रोनच्या साहाय्याने देखरेख ठेवली जाणार आहे.
पांडुरंगाच्या दर्शनासाठी टोकन व्यवस्था!
या वर्षी एक नवीन व्यवस्था देखील लागू करण्यात आली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात टोकनद्वारे दर्शनाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तिरुपती मंदिराच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या प्रणालीमुळे, भाविकांना तासंतास रांगेत थांबण्याची गरज भासणार नाही. यासाठी भाविकांनी www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर जाऊन दर्शनासाठी तारीख व वेळ निवडून टोकन बुक करावे. टोकनची प्रिंट काढून संत ज्ञानेश्वर मंडपात पडताळणी केल्यानंतर ठरलेल्या वेळेनुसार थेट दर्शन मिळणार आहे.
भाविकांसाठी दररोज सहा स्लॉट उपलब्ध असून, प्रत्येकी एक तासाचे वेळापत्रक ठेवण्यात आले आहे. सकाळी ९ ते १० या वेळेपासून सुरुवात होणार असून, प्रत्येकी स्लॉटसाठी २०० भाविकांना प्रवेश दिला जाईल. मात्र ही सुविधा मुख्य गर्दीच्या तीन दिवसांव्यतिरिक्त इतर दिवशीच उपलब्ध असणार आहे. या सर्व यंत्रणा आणि सोयीमुळे यंदाची आषाढी वारी अधिक नियोजनबद्ध, सुरक्षित आणि भाविकांसाठी सुलभ ठरणार असल्याची खात्री व्यक्त केली जात आहे.