उत्तराखंड : केदारनाथहून येणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळ कोसळले

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
15th June, 10:53 am
उत्तराखंड : केदारनाथहून येणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळ कोसळले

डेहराडून : उत्तराखंडमधील चारधाम यात्रेदरम्यान रविवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी अपघात घडला. केदारनाथ धामहून गुप्तकाशीच्या दिशेने निघालेले एक खासगी हेलिकॉप्टर रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व सात जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका २३ महिन्यांच्या बालकाचाही समावेश आहे.

हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे होते आणि रविवारी पहाटे सुमारे ५.२० वाजता ही दुर्घटना घडली. अपघाताचे प्राथमिक कारण खराब हवामान असल्याचे सांगण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळले, त्या गौरीमाई खार्कच्या वरील जंगल भागात पहाटेच्या वेळी पोहोचणे सुरुवातीला अवघड ठरत होते.



हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणाऱ्या सात जणांमध्ये महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंब होते. यामध्ये राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि त्यांचा अवघ्या २३ महिन्यांचा चिमुकला मुलगा काशी जयस्वाल याचा समावेश होता. तसेच, यात्रेकरू तुस्ती सिंग, स्थानिक कर्मचारी विनोद नेगी व बीकेटीसीचे कर्मचारी विक्रम सिंग रावत आणि हेलिकॉप्टरचे वैमानिक कॅप्टन राजीव हेही मृत्यूमुखी पडले. अपघातात मृतदेह गंभीररित्या होरपळले असल्याची माहितीही समोर आली आहे. 

या घटनेवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोक व्यक्त केला असून, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील हेलिकॉप्टर अपघाताची दुःखद माहिती मिळाली. बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरू आहे. सर्वांच्या सुरक्षेसाठी बाबा केदारनाथकडे प्रार्थना करतो, असे त्यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये नमूद केले आहे.

याआधीही उत्तराखंडमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या आहेत. ७ जून रोजी केदारनाथकडे निघालेले क्रिस्टल कंपनीचे एक हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे रुद्रप्रयाग-गौरीकुंड महामार्गावरच आपत्कालीन लँडिंग करताना अपघातग्रस्त झाले होते. त्या अपघातात पायलट जखमी झाला होता, मात्र सर्व प्रवासी सुखरूप होते.



तसेच त्याआधी ८ मे रोजी उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री महामार्गावरील गंगणीजवळ एरोट्रान्स कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले होते. त्या अपघातात पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला होता. एक जण गंभीर जखमी झाला होता. उत्तराखंडच्या उंच डोंगराळ प्रदेशात बदलत्या हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाणे नेहमीच धोकादायक ठरत आली आहेत. प्रशासनाकडून यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, खराब हवामानात उड्डाणांबाबत अधिक काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात्रेकरूंसाठी सुरू असलेल्या हेलिकॉप्टर सेवा सध्या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.



हेही वाचा