द. आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला घातली गवसणी

केला ऑस्ट्रेलियाचा ५ गड्यांनी पराभव, मार्करम-बवूमा-रबाडा ठरले विजयाचे शिल्पकार.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
14th June, 06:39 pm
द. आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला घातली गवसणी

लंडन : दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने अखेर २७ वर्षांची प्रतीक्षा संपवली असून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ५ गड्यांनी पराभव करत आपले पहिलेच वर्ड टेस्ट विजेतेपद पटकावले. यासह आफ्रिकेने त्यांच्यावर आयसीसी स्पर्धांतील निर्णायक टप्प्यांवरील पराभावामुळे बसलेला ‘चोकर्स’चा ठप्पा झुगारत एक नवा इतिहास घडवला.

 


या सामन्याच्या चौथ्या डावात द. आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करम याने १३६ धावांची शानदार खेळी करत सामन्याचे रुपडे पालटले.  आयसीसीच्या अंतिम फेरीत शतक झळकावणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकन फलंदाज ठरला. कर्णधार टेम्बा बावुमा याने हॅमस्ट्रिंगच्या दुखापत्नीने त्रस्त असूनही खेळपट्टीवर नांगर टाकून ६६ धावांचे योगदान देत निर्णायक क्षणी जबाबदारी सांभाळली.




सामन्याचा थरार आणि निर्णायक क्षण

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांत आटोपला. कगिसो रबाडाने ५ बळी घेत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, यानंतर फलंदाजीला उतरलेल्या द. आफ्रिकेचा पहिला डाव फक्त १३८ धावांत संपला. पॅट कमिन्सने ६ बळी घेत सामन्याचे पारडे ऑस्ट्रेलियाकडे झुकवले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या डावात काहीसा नियंत्रण मिळवेल असे वाटत असतानाच अवघ्या ७.४ षटकांमध्ये ७ गडी गमावले. पण शेवटी मिचेल स्टार्कच्या ५२ धावांच्या चिवट खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने एकूण २८१ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले. चौथ्या डावात आफ्रिकेने कमालीचा आत्मविश्वास दाखवत २८२ धावांचे लक्ष्य ५ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. यामध्ये मार्करमची खेळी निर्णायक ठरली.



आयसीसीच्या सर्व स्पर्धांतील द. आफ्रिकेचे अविस्मरणीय विजय :

द. आफ्रिकेने याआधी केवळ १९९८ मध्ये आयसीसी नॉकआउट ट्रॉफी (आताचे चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकले होते. त्यानंतर अनेक वेळा उपांत्य व अंतिम फेरी गाठली पण प्रत्येक वेळी निर्णायक क्षणी पराभव पत्करावा लागला. २०२४ च्या टी२० वर्ल्ड कप अंतिम सामन्यात भारताकडून निसटता पराभव झाल्यानंतर, संघाच्या भाळी  ‘चोकर्स’ चा टिळा पुन्हा उमटला. मात्र मार्करमची दमदार फलंदाजी आणि कर्णधार बवूमाने त्याला दिलेल्या यथोचित साथीने दक्षिण आफ्रिकेने हा कलंक पुसून टाकला आहे.



द. आफ्रिकेचा संघ आज क्रिकेटच्या इतिहासात नव्याने झळाळला आहे. एडन मार्करमची ऐतिहासिक खेळी, रबाडाचा निर्णायक मारा आणि कर्णधार बावुमाचे शिस्तबद्ध नेतृत्व यांमुळे आफ्रिकन क्रिकेटमध्ये नव्या पर्वाचा उदय झाला आहे. आजचा दिवस दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.