१८ कोटींचा घसघशीत खर्च... पण ड्रायव्हरला 'यू-टर्न' घेऊन विचार करावा लागतो
भोपाळ: मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळच्या ऐशबागमध्ये एक नवीन रेल्वे ओव्हरब्रिज बांधण्यात आला आहे. वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून उभारण्यात आलेला हा पूल सर्वत्र उद्घाटनापूर्वीच वादात सापडला आहे. कारण या पुलाचे डिझाइन आणि डिझाईननुसार पुलाला असलेले ९० अंशांचे धोकादायक वळण. या चमत्कारिक प्रकरावर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी मात्र सारवासारव केल्याचे दिसून आले.
नेमका प्रकार काय?
भोपाळमध्येच्या ऐशबागमध्ये पीडब्ल्यूडीकडून रेल्वे ओव्हरब्रिज उभारणीचे काम गेल्या आठ वर्षांपासून सुरू होते. काही दिवसांपूर्वी या ओव्हरब्रिजचे बांधकाम पूर्णत्वास गेले मात्र १८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलावरील धोकादायक ९० अंशाच्या वळणाने लोकांना धक्का बसला आहे. वाहनचालकांना अचानक ९० अंशांवर वाहन वळवण्यात अडचणी येऊ शकतात असं लोकांचे म्हणणं आहे.
लोकवस्तीच्या ठिकाणी उभारणी
या पुलाची लांबी ६४८ मीटर आहे. हा पूल दाट लोकवस्तीच्या ठिकाणी बांधला आहे. तसेच या भागात वाहतूक कोंडीची समस्याही भेडसावते. कमी जागेमुळे या पुलाची रचना अशा प्रकारे करण्यात आल्याचे बोलले जातेय. परंतु, उद्घाटनापूर्वीच हा पूल वादात सापडला आहे.
समाजमाध्यमांवरून सरकारवर ताशेरे
या पुलाच्या ९० अंशांच्या तीव्र वळणाबाबत आणि बांंधणाऱ्या इंजिनिअर विषयी लोक समाजमाध्यमावर प्रश्न उपस्थित करत आहेत. या पुलामुळे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे असून बांधकामासाठी खर्च केलेले १८ कोटी रुपये पाण्यात गेल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. वाहनचालकांना ९० अंशांवर वाहन वळवण्यात अडचणी येऊ शकतात असे लोकांचे म्हणणे आहे. नेटकऱ्यांनी या पुलाच्या कामावरून सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह यांना पुलाच्या डिझाइनबद्दल विचारले असता, "पुलाच्या बांधकामानंतर काही तज्ञ पुढे आले आहेत आणि त्यांनी बोलणे सुरू केले आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल," असं मंत्री राकेश सिंह म्हणाले.