सीसीटीव्ही फुटेज व्हायरल; कोल्हापूरचे अन्न निरीक्षक गंभीर जखमी
मुंबई: मुंबई कोस्टल रोडवरील (Mumbai Coastal Road) बोगद्यात एक वेगवान कार अचानक घसरून उलटल्याची घटना शुक्रवारी रात्रौ उशीरा घडली आहे. या अपघातात कारमध्ये बसवलेल्या दोन्ही एअरबॅग उघडल्या मात्र तरीही कार चालक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
या अपघाताविषयी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) मिळालेल्या माहितीनुसार, कोस्टल रोडच्या दक्षिणेकडील बोगद्यात भरधाव वेगात जात असलेल्या बीएमडब्ल्यू चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला धडकली आणि उलटली. या घटनेनंतर कोस्टल रोडवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच,पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाग्रस्त गाडीला बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या वाहनाचा चालक विकास सोनवणे हे कोल्हापूरचे (Kolhapur) अन्न निरीक्षक असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला असून त्यात एक पांढऱ्या रंगाची कार उलटताना दिसत आहे.
मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सागरी किनारा मार्गावरील दक्षिणेकडील बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. इंधन बचतीसोबतच वाहतूक कोंडी कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो. मात्र या मार्गावर वारंवार अपघात होत असल्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.