इस्रायलच्या हल्ल्यात ७८ ठार : इराणची आण्विक, लष्करी केंद्रे लक्ष्य
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
तेल अविव : इस्रायलने इराणवर ‘ऑपरेशन रायझिंग लायन’अंतर्गत मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. यात इराणचे लष्करप्रमुख मोहम्मद बाघेरी, अणुशास्त्रज्ञ मोहम्मद मेहदी तेहरांची आणि फरेदून अब्बासी, तसेच रिव्होल्युशनरी गार्ड्स कमांडर गोलाम अली राशिद यांच्यासह ७८ जणांचा मृत्यू झाला. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणने शुक्रवारी रात्री सुमारे १०० ड्रोनद्वारे हल्ला चढवला. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खाेमेनी यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणने प्रतिहल्ला केला. इस्रायलने २०० लढाऊ विमानांच्या साहाय्याने इराणमधील १०० हून अधिक ठिकाणी हल्ले केले. रात्री पुन्हा इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर हल्ले सुरू केले.
इस्रायलने केलेल्या भीषण हल्ल्यात प्रामुख्याने इराणच्या आण्विक आणि लष्करी केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ)ने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल २००हून अधिक लढाऊ विमानांचा वापर करून इराणमधील विविध ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. यामध्ये इराणचे तीन आणीबाणी नियंत्रण कमांडर ठार झाले. या तिघांनाही आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा हिंसाचार घडवण्यात जबाबदार धरले जात होते. त्यांचा मृत्यू ही संपूर्ण जगासाठी दिलासा देणारी बाब आहे.
इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानमध्ये जोरदार स्फोट झाले. शहरभर धुराचे लोट पसरले होते. यानंतर इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्राइल कात्झ यांनी देशात विशेष आपत्कालीन स्थिती जाहीर केली. शाळांना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणमध्ये सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.
इराणचे अणुबॉम्ब आमच्यासाठी अस्तित्वाचा धोका : नेतन्याहू
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी व्हिडीओ संदेशात म्हटले की, इराणने इतके समृद्ध युरेनियम तयार केले आहे की ते नऊ अणुबॉम्ब तयार करू शकतात. हे आमच्या अस्तित्वासाठी धोका आहे. आम्ही डोळे झाकून राहू शकत नाही. नेतान्याहू यांनी यापूर्वीच इराण अण्वस्त्रे तयार करत असल्याचे पुरावे मिळाले असल्याचा इशारा दिला होता.
अमेरिकेची भूमिका
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी स्पष्ट केले की, हा हल्ला इस्रायलने एकतर्फी घेतलेला निर्णय होता. अमेरिकेचा यामध्ये थेट सहभाग नाही. आमचा प्राथमिक उद्देश म्हणजे अमेरिकन सैन्य आणि दूतावास सुरक्षित ठेवणे हा आहे.
इराणमध्ये उमटलेल्या संतप्त प्रतिक्रिया
इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) : हे हल्ले निष्फळ ठरणार नाहीत. इस्रायलने आता कठोर आणि दु:खद बदल्याची तयारी ठेवावी.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खाेमेनी : या गुन्ह्यासाठी झायनिस्ट (इस्रायली) शासनाला कडवट आणि वेदनादायक शिक्षेस सामोरे जावे लागेल. इस्रायलने आमच्या देशावर अत्याचार केला असून, त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.
इराणचे सशस्त्र दल : अल-कुद्स (जेरुसलेम) व्यापणाऱ्या दहशतवादी शासनाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यापुढे आमच्या कारवाईवर कोणतीही मर्यादा उरलेली नाही.
जनरल स्टाफ प्रवक्ते अबोलफजल शेकर्ची : इस्रायलला हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल.
इराणचे परराष्ट्र मंत्रालय : यूएन चार्टरच्या अनुच्छेद ५१ नुसार आमच्याकडे बचावात्मक कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. अमेरिकेच्या संमतीशिवाय इस्रायलने असा हल्ला करण्याचे धाडस केले नसते.
आखाती क्षेत्रात तणाव, तेलाच्या किमतीत वाढ
इराण-इस्रायल संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत आखाती क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे. खनिज तेलाच्या किमतीत तब्बल १२ टक्के वाढ झाली आहे. २०२३ मध्ये चीनच्या मध्यस्थीने इराण-सौदी संबंध पूर्ववत झाले होते, मात्र सध्याचा संघर्ष पुन्हा एकदा मध्यपूर्वेत अस्थैर्य निर्माण करू शकतो.