सात ठिकाणी लागवड करण्याचे वन विभागाचे ध्येय
सावंतवाडी : गेल्या काही वर्षात अवैध वृक्षतोड व अन्य कारणांमुळे सुरंगीच्या झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी सुरंगीची लागवड केली जाणार आहे. सुरंगीच्या २,६०० रोपांची लागवड करण्याचे वन विभागाने ठरविले आहे.
पश्चिम घाटात प्रामुख्याने कोकणातील सिंधुदुर्ग आणि गोव्यातील काही भागात या वृक्षांची नैसर्गिक लागवड आढळते. ही अत्यंत दुर्मीळ वनस्पती आहे. त्यामुळे सुरंगीच्या संवर्धनासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. यावर्षी जिल्ह्यात सात ठिकाणी सुंरगी वने तयार करण्यात येणार आहेत. दरवर्षी ही लागवड टप्प्याटप्प्याने वाढवण्याचे नियोजन आहे, असे सिंधुदुर्ग वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी सांगितले.
सावंतवाडी, वेगुर्ले, कुडाळ आणि कणकवली या चार तालुक्यांमधील सात गावांमध्ये ही सुरंगीची वने तयार केली जाणार आहेत. यासाठी वन विभागाने रोपवाटिका तयार केली असून निरवडे, मठ, साईगाव, भिरेवडे, भडगाव नांगरतास, घोटगेवाडी येथे सुरंगी लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी रोपेही वितरित करण्यात आली असून, यंदाच्या पावसाळ्यात या वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ गावातील ४५ हेक्टरवर सुरंगीची नैसर्गिक लागवड आहे. यातून स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध होत असतो. फुलांच्या विक्रीतून जवळपास १६ कोटी रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे भरघोस उत्पन्न देणारे नगदी पीक म्हणूनही सुरंगीकडे पाहिले जाते.