प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर : अभिषेक शर्माच्या तुफानी ५९ धावा
लखनौ : मिचेल मार्श-एडन मारक्रम या सलामी जोडीने केलेली शतकी भागीदारी आणि त्यानंतर निकोलस पूरन याने दिलेला फिनिशिंग टच या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादसमोर २०६ धावांचे आव्हान ठेवले होते. लखनौने २० षटकांमध्ये ७ गडी गमावून २०५ धावा केल्या. हैदराबादने हे लक्ष्य १८.२ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामुळे लखनौ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहे. हैदराबादसाठी अभिषेक शर्माने ५९ धावांची खेळी केली.
हैदराबादने टॉस जिंकला. कर्णधार पॅट कमिन्स याने लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडले. लखनौच्या सलामी जोडीने याचा चांगलाच फायदा घेतला. मिचेल मार्श आणि एडन मारक्रम या ओपनिंग जोडीने शतकी भागीदारी केली. या दोघांनी १०.२ षटकांमध्ये ११५ धावांची भागिदारी केली. त्यानंतर मिचेल मार्श बाद झाला. मार्शने ३९ चेंडूमध्ये ४ षटकार आणि ६ चौकाराच्या मदतीने सर्वाधिक ६५ धावा केल्या.
मार्श आऊट झाल्यानंतर कॅप्टन ऋषभ पंत तिसऱ्या स्थानी फलंंदाजीसाठी आला. पंत या सामन्यातही ढेर झाला. पंत ७ धावा करून बाद झाला. पंतनंतर एडन मारक्रम याने निकोलस पूरनसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र काही धावा जोडल्यानंतर मारक्रम बाद झाला. मारक्रम याने ३८ चेंडूमध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. आयुष बदोनीकडून मोठ्या फटक्यांची आशा होती. मात्र आयुष ३ धावा करुन बाद झाला.
त्यानंतर निकोलस पूरन याने अब्दुल समद याच्यासह थोडा वेळ मैदानात घालवला. पूरनने फटकेबाजी करत लखनौला २०० पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. मात्र मोक्याच्या क्षणी निकोलस रन आऊट झाला. निकोलसने २६ चेंडूमध्ये ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४५ धावा केल्या. शार्दूल ठाकुरने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या (वाईड) चेंडूवर तो रनआऊट झाला.शार्दुलनंतर अब्दुल समद यानेही मैदानाबाहेरचा रस्ता धरला. समदने ३ धावा केल्या. तर लखनौच्या डावातील शेवटच्या चेंडूवर आकाश दीप याने षटकार ठोकला. त्यामुळे लखनौला २०५ धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून एशान मलिंगा याने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर हर्ष दुबे, हर्षल पटेल आणि नितीश कुमार रेड्डी या तिघांनी प्रत्येकी १-१ बळी
घेतला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना हैदाराबाद तर्फे सलामीवीर अथर्व तायडे फक्त १३ धावा करून विल्यम ओ'रुर्केच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र अभिषेक शर्माने तुफानी फटकेबाजी करत २० चेंडूत ५९ धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने या खेळीत ४ चौकार आणि ६ षटकार खेचले. डिग्वेश राठीने त्याला ठाकूर करवी झेलबाद करत मोठा झटका दिला.ईशान किशनने देखील काहीसा प्रतिकार करत ३५ धावा केल्या, पण तोही राठीच्या गोलंदाजीला बळी पडला. हेनरिक क्लासेनने आक्रमक ४७ धावा करत झटपट धावा जमवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ठाकूरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.कामिंदू मेंडिसने ३२ धावा करून हैदराबादच्या विजयाचा मार्ग सोपा केला.
लखनौतर्फे दिग्वेश राठीने ३७ धावांत २ बळी घेतले. तर ओ'रुर्के आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. हैदाराबादने हा सामना १८.२ षटकांत ६ गडी राखून जिंकला.
सनरायझर्स हैदराबाद वि. लखनौ सुपर जायंट्सच्य सामन्यात दोन भारतीय खेळाडू एकमेकांविरूद्ध घालताना दिसले. या रोमांचक सामन्यात हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा वादळी फटकेबाजी करताना दिसला. अभिषेक शर्माने लखनौने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. पण यादरम्यान त्याने दिग्वेश राठीबरोबर वाद घातला.
सनरायझर्सचा सलामीवीर अभिषेक शर्मा झेलबाद झाल्यानंतर दिग्वेश राठीवर चांगलाच संतापलेला दिसला. लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठीने अभिषेकला बाद केले तेव्हा ही घटना घडली, त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंचांना आणि इतर खेळाडूंना हस्तक्षेप करावा लागला.
हर्षल पटेलचा विक्रम
हर्षल पटेलने लखनौविरुद्धच्या सामन्यात युझवेंद्र चहलचा एक मोठा विक्रम मोडला. हर्षलने आयपीएलमध्ये १५० विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. चहलचा विक्रम मोडत त्याने हा टप्पा गाठणारा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. हर्षलला हे यश मिळवण्यासाठी केवळ ११४ सामने लागले, तर चहलला इंडियन प्रीमियर लीगमध्ये १५० विकेट्स घेण्यासाठी ११८ सामने खेळावे लागले होते.
दरम्यान, हर्षल आयपीएलमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. तो मुंबई इंडियन्सच्या माजी दिग्गज लसिथ मलिंगाच्या मागे आहे, ज्याने १०५ सामन्यांमध्ये हा पराक्रम केला होता.
हर्षल पटेलने डावाच्या तिसऱ्या षटकात एडन मार्करमला बाद केल्यानंतर ही खास कामगिरी केली. हर्षलने आपल्या पहिल्या दोन षटकांत २१ धावा दिल्या होत्या आणि तिसऱ्या षटकात बळी घेतला.
आयपीएलमध्ये सर्वात जलद १५० बळी
१०५ सामने - लसिथ मलिंगा
११४ सामने- हर्षल पटेल
११८ सामने - युझवेंद्र चहल
१२२ सामने - राशिद खान
१२४ सामने- जसप्रीत बुमराह
मार्शचा षटकार ५ लाखांचा
लखनौ सुपर जायंट्सच्या डावातील सहाव्या षटकात, मिचेल मार्शने इशान मलिंगाच्या षटकात चांगलीच फटकेबाजी केली. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर, मिचेल मार्शने एका लेंथ बॉलवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर एक षटकार ठोकला . हा षटकार थेट सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या टाटा कर्व्ह कारवर जाऊन धडकला, ज्यामुळे कारला डेंट आला. त्यामुळे या षटकाराची किंमत ५ लाख रुपये झाली. हंगामाच्या सुरुवातीला, टाटा मोटर्सने घोषणा केली होती की जर कोणत्याही फलंदाजाने थेट गाडीवर चेंडू मारला तर ते ग्रामीण क्रिकेट विकासासाठी ५ लाख रुपयांचे क्रिकेट किट दान करतील. त्यामुळे मार्शचा हा षटकार या उपक्रमाचा एक भाग बनला.
मुंबई-दिल्लीत प्लेऑफसाठी चुरस
आयपीएलच्या १८ व्या हंगामातून प्लेऑफ्सच्या शर्यतीबाहेर पडलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाने लखनौच्या मैदानात रंगलेली २०० पारची लढाई जिंकत लखनौ सुपर जाएंट्सलाही आपल्या पक्तींत बसवले. या सामन्याआधी लखनौचा संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीत होता. पण घरच्या मैदानातील पराभवासह लखनौच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत. लखनौचा संघ यंदाच्या हंगामातून प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट होणारा पाचवा संघ ठरला आहे. या निकालानंतर आता प्लेऑफ्सच्या एका जागेसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यानंतर चौथा संघ कोण हे चित्र २१ तारखेला स्पष्ट होईल.