पंचायत खात्यात आता एआय आधारीत ‘उपस्थिती प्रणाली’

कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th April, 11:52 pm
पंचायत खात्यात आता एआय आधारीत ‘उपस्थिती प्रणाली’

पणजी : पंचायत खात्यातर्फे एआय आधारीत उपस्थिती प्रणाली बसवण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर अधिक योग्य पद्धतीने लक्ष ठेवणे, एका कर्मचाऱ्याची उपस्थिती दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून लावण्याचे प्रकार टाळण्यासाठी, अन्य फसव्या उपस्थिती पद्धतींची शक्यता कमी करणे, बायोमेट्रिक सिस्टम, पंच कार्ड सारख्या जुन्या उपस्थिती पद्धतींना बदलणे आदी विविध कारणांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जीईएलतर्फे कंत्राट जारी करण्यात आले आहे.

बोली जिंकणाऱ्यास नव्या उपस्थिती प्रणालीमध्ये रियल टाइम एआय तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. आधुनिक फेशियल रिकगनाईजेशनद्वारे उपस्थिती लावलेला कर्मचारी तोच असल्याचे ओळखणे सोपे होणार आहे. कर्मचाऱ्यांना ही प्रणाली त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरकारी कामासाठी कार्यालयाच्या बाहेर असल्यास मोबाईलद्वारे उपस्थिती लावण्याचा पर्याय प्रणालीमध्ये असणार आहे. तसेच जिओ टॅगिंग, साईन इन केल्यावर लोकेशन ट्रॅक करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. याशिवाय ही प्रणाली ऑफलाईन पद्धतीने काम करण्यास सक्षम असणार आहे. यामुळे एखाद्या ठिकाणी इंटरनेट सेवा नसली तरी कर्मचाऱ्यांना उपस्थिती लावता येणार आहे. सर्व कर्मचारी त्यांच्या नियुक्त ठिकाणांनुसार वेळेवर कामावर हजर राहतील याची खात्री करून नागरिकांना वेळेवर सेवा देण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. विभाग प्रमुखांना कर्मचाऱ्यांची उपस्थिती व अन्य डेटा यांचे विश्लेषण करता येणार आहे. प्रणाली कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत अहवाल तयार करू शकणार आहे. प्रशासनात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. 

हेही वाचा