बार्देशः म्हापशात पुन्हा 'एफडीए' ची कारवाई, भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले

संबंधित आस्थापनांवर कडक कारवाई करणार, आरोग्य मंत्री विश्वजीत राणेंचा इशारा

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
15th April, 10:48 am
बार्देशः म्हापशात पुन्हा 'एफडीए' ची कारवाई, भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले

पणजी : खाद्यपदार्थांमध्ये रंग वापरुन तसेच भेसळ करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर 'एफडीए' ची करडी नजर असून आठवडाभरापासून 'एफडीए' ने धडक मोहीम सुरू केली आहे. एफडीएच्या या कारवाईमुळे पदार्थांत भेसळ करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील काही आस्थापने खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करत आहेत. अशा पदार्थांच्या सेवनाचा फटका राज्यातील जनतेच्या आरोग्याला बसत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित आस्थापनांवर कारवाई कडक करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी आठवडाभरापूर्वीच स्पष्ट केले होते. 

याच अनुषंगाने 'एफडीए' अलर्ट मोडवर असून म्हापसा आणि लगतच्या काही भागात 'एफडीए'ने विशेष देखरेख मोहीम राबवत आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी म्हापसा - करासवाडा व थिवीमध्ये अन्न व औषधे प्रशासनाने १८ आस्थापनांची तपासणी केली होती. यातील स्वच्छता आणि सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे ८ आस्थापने बंद केली होती. याशिवाय याच परिसरातील बेकरी, ज्यूस सेंटर, फास्टफूड स्टॉल व हॉटेलची पाहणी करण्यात आली. 


इतर राज्यांतून गोव्यात आणली जाणारी फळे तसेच इतर खाद्यपदार्थांमध्येही रंग वापरल्याचे किंवा भेसळ झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे 'एफडीए'कडून सीमांवर गस्त घालून अशा पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची झडती घेण्यात येणार असल्याचे राणेंनी सांगितले आहे.

मागील काही दिवसांतील एफडीएची कारवाई-
खाद्यान्नातील भेसळ लोकांना ओळखता येत नाही. त्याचाच फायदा भेसळखोर घेत असून सध्या लग्नसराईच्या निमित्ताने मिठाई तसेच अन्य तयार खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर  एफडीएची विशेष देखरेख मोहीम सुरू आहे.


▪ शुक्रवार दि. ११ रोजी सायंकाळी करासवाडा व थिवीमध्ये अन्न व औषधे प्रशासनाने १८ आस्थापनांची तपासणी केली. या मोहिमेवेळी एफडीए कडून प्रसिद्ध बेकरी, ज्यूस सेंटर, फास्टफूड स्टॉल व हॉटेलची पाहणी करण्यात आली. यावेळी आठ आस्थापनांमध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून आल्याने ती बंद करण्यात आली.

▪ म्हापसा मार्केट सब यार्डमध्ये कृत्रिमरीत्या पिकवल्या जाणाऱ्या आंबा व केळी विक्री घाऊक दुकानांवर अन्न व औषधे प्रशासनाने सोमवारी १४ रोजी छापा टाकून सुमारे ८ लाखांचा माल जप्त केला. यामध्ये १८० पेट्या आंबा व ४५० किलो केळींचा समावेश असून तीन दुकाने बंद करण्यात आली.

▪ म्हापशातील प्रसिद्ध वाळके हॉटेलमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षा निकषांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. याप्रकारामुळे एफडीए कडून हॉटेल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

हेही वाचा