राज्यातील सहापैकी पाच धरणांत गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा

पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा पुरेल : जलस्रोत अधिकाऱ्यांची माहिती


04th March, 11:56 pm
राज्यातील सहापैकी पाच धरणांत गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात गतवर्षीच्या मार्चच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत यंदा सहापैकी पाच धरणांत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील साळावली, अंजुणे, चापोली, गावणे, आमठाणे धरणात गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पंचवाडी धरणातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा अधिक आहे. राज्यात मार्च ते मे दरम्यान उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. असे असले तरी सध्याचा पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरेल, अशी माहिती जलस्रोत खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२५ रोजी दक्षिण गोव्याची तहान भागवणाऱ्या साळावली धरणात ७२.५१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर ४ मार्च २०२६ अखेरीस या धरणात ६७.७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अंजुणे धरणात मागील वर्षी २ मार्च रोजी ५९.६४ टक्के पाणीसाठा होता. तर ४ मार्च २०२६ अखेरीस अंजुणेत ५२.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी पंचवाडी धरणात ५६.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी या धरणात ५७.८० टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी गावणे धरणात ७२.४६ टक्के, तर यावर्षी ६९.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. चापोली धरणात ४ मार्च २०२५ रोजी ७०.४३ टक्के पाणीसाठा होता. ४ मार्च २०२६ रोजी ६७.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी राज्यात २५ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. जून, जुलैच्या महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढण्यात मदत झाली होती.
आमठाणेत सर्वांत कमी पाणीसाठा
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सहापैकी आमठाणे धरणात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी ४ मार्च रोजी आमठाणेत ३९.३१ टक्के इतका पाणीसाठा होता. यंदा ४ मार्च अखेरीस आमठाणेत ३०.५९ टक्के पाणीसाठा आहे.