पेडणे : केरी किनाऱ्यावर विना परवाना पॅराग्लायडिंग करणे भोवले

८ जणांना तेरेखोल किनारी सुरक्षा पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रकरण पर्यटन खात्याकडे वर्ग.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
22nd March, 02:55 pm
पेडणे : केरी किनाऱ्यावर विना परवाना पॅराग्लायडिंग करणे भोवले

पणजी : पेडणे तालुक्यातील केरी समुद्र किनारी विना परवाना पॅराग्लायडिंग करणाऱ्या पुणे आणि मुंबईतील ८ जणांना तेरेखोल किनारी सुरक्षा पोलिसांनी ताब्यात घेतले. हाती आलेल्या माहितीनुसार ही घटना आज शनिवार २२ मार्च, दुपारी १२ वाजता घडली. यावेळी संबंधित पर्यटकांकडील साहित्यही जप्त  करण्यात आले. याप्रकरणी तेरेखोल किनारी सुरक्षा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विक्रम नाईक आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. प्रकरण पर्यटन खात्याकडे वर्ग करण्यात आले आहे.  




चालू पर्यटन हंगामाच्या सुरुवातीला घडलेल्या काही अनुचित घटनांमुळे राज्यात विना परवाना साहसी खेळांचे आयोजन करण्यास काही निर्बंध घालण्यात आले होते. दरम्यान पर्यटन खात्याने निर्धारित केलेल्या नियमांची पायामल्ली राजरोस सुरू असल्याचे दृष्टीस पडते. 


 

२५ डिसेंबर २०२४, रोजी कळंगूट समुद्रात जलसफरीवर गेलेली बोट उलटली, एकास मरण 

कळंगूट येथे पर्यटकांना समुद्रात जलसफरीवर घेऊन गेलेली बोट उलटल्याची धक्कादायक बातमी समोर आली. दुर्घटनेत सुर्यकांत पोफळकर (४५, रा. खेड रत्नागिरी) यांचा बुडून मृत्यू झाला.  खेड- महाराष्ट्रातील पोफळकर, चिंचविलकर व हंबीर या कुटूंबांमधील १३ जण गोव्यात नाताळच्या सुट्टी निमित्त आले होते. 


One dead, 20 rescued after tourist boat capsizes in Arabian Sea off  Calangute beach in Goa | India News – India TV


१३ पर्यटकांना घेऊन जॉन वॉटर स्पोर्टस् ही जलसफरी करणारी बोट समुद्रात उतरली. सुमारे शंभर मीटर अंतरावर या बोटचे इंजिन वाळूत रुतून पडले आणि इंजिन बंद पडले. त्याचवेळी समुद्राच्या लाटेची जोरदार धडक बसल्याने बोट पाण्यात कलंडली. तत्पुर्वी बोटने या ठिकाणी एक गोलाकार फेरी मारली होती व दुसरी फेरी मारतेवेळी ही दुर्घटना घडली. बोट कलंडल्याने सर्व पर्यटक प्रवासी पाण्यात फेकले गेले. या अपघातात सुर्यकांत पोफळकर (४५) यांचे तोंड बोटीला धडकले व ते रंक्तबंबाळ होऊन त्यांचा मृत्यू झाला. सर्व प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातले होते. अपघात घडताच किनार्‍यावरील बोटवाल्यांसह जीवरक्षक, किनारी व पर्यटक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बुडणार्‍या या पर्यटकांसह बोटवरील दोघा कर्मचार्‍यांना पाण्याबाहेर काढले. जीवरक्षक तसेच रूग्णवाहिकेतील कर्मचार्‍यांनी या पर्यटकांना सीपीआर दिला व सर्वांना कांदोळी येथील प्राथमिक केंद्रात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी सूर्यकांत पोफळकर यांना मृत घोषित केले.


One Dead, 20 Rescued After Tourist Boat Capsizes Off Calangute Beach In Goa  - Amar Ujala Hindi News Live - Boat Capsizes:गोवा में कैलंगुट बीच के पास  पर्यटकों से भरी नाव पलटी;


कळंगूट समुद्रात काल जलसफरीदरम्यान झालेल्या बोट अपघाताला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून बोट ऑपरेटर धारेप्पा झिराली (४२, बेळगाव) आणि इब्राहीमसाब (३४, शिमोगा) यांना पणजी किनारी पोलिसांनी अटक केली. बोट मालक मीना कुतिन्हो हिच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला. बोट मालकाने कळंगुट येथे जलक्रीडा उपक्रम किंवा व्यवसाय करण्यासाठी संबंधित विभागाकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती, असे आढळून आले.  पर्यटन विभागाने निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ऑपरेटरवर तीन वर्षांसाठी बंदी घातली व डिपोजिटदेखील जप्त केले. 

१७ जानेवारी २०२५, केरी समुद्रकिनारी पॅराग्लायडिंग करणाऱ्या युवतीसह ऑपरेटरचा पडून मृत्यू

केरी समुद्रकिनारी पॅराग्लायडिंगचा आनंद लुटणाऱ्या पर्यटक युवतीसह पॅराग्लायडिंग ऑपरेटरचा पडून मृत्यू झाला. पुणे येथील पर्यटक शिवानी दाभाळे (वय २६ वर्षे) आणि पॅराग्लायडिंगचा ऑपरेटर सुमन नेपाळी (वय २५) या दोघांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.


Woman tourist, instructor die in paragliding accident in North Goa: Report  | Latest News India - Hindustan Times


अधिक माहितीनुसार, पॅराग्लायडिंग ऑपरेटर सुमन नेपाळी आणि पर्यटक शिवानी दाभाळे हे दोघेही पॅराग्लायडिंग करत असताना अचानक पॅराग्लायडिंगची एक दोरी तुटल्यानंतर थेट डोंगरावर पडून यात या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी ४.३०च्या सुमारास घडली. याबाबतचा गुन्हा मांद्रे पोलीस स्थानकात नोंदवण्यात आला. दरम्यान २७ फेब्रुवारी रोजी नियमांची पायामल्ली करत, राजू गवंडी हा केरी डोंगर पठारावर पॅराग्लायडिंग करत असल्याची तक्रार आल्यानंतर लगेच घटनास्थळी पर्यटक पोलिसांनी धाव घेतली. त्याच्याकडून सर्व प्रकारचे साहित्य जप्त करून गुन्हा नोंदवला. गोवा पर्यटक व्यापार नोंदणी कायदा कलम २५-ए नुसार ही कारवाई करण्यात आली.  



हेही वाचा