‘स्मार्ट सिटी’च्या अत्याधुनिक मीटरमुळे महसुली तोटा ४७ टक्क्यांनी घटला

दरवर्षी ४.८ कोटी लिटर पाण्याची बचत झाल्याचा दावा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd March, 12:27 am
‘स्मार्ट सिटी’च्या अत्याधुनिक मीटरमुळे महसुली तोटा ४७ टक्क्यांनी घटला


पणजी :
राजधानीत बसवलेल्या पाण्याच्या अत्याधुनिक स्मार्ट मीटर तसेच पर्यवेक्षी नियंत्रण आणि डेटा संपादन (एससीएडीए) आदींमुळे पाण्याची गळती बंद करण्यात यश आले आहे. यामुळे सरकारचा महसुली तोटा ४७ टक्क्यांनी कमी होऊन दरवर्षी ४.८ कोटी लिटर पाण्याची बचत झाल्याचा दावा स्मार्ट सिटी लिमिटेडने केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरात ३०८८ मीटर बसवण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात सुमारे ८ हजार मीटर बसवण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात जल पुरवठ्याचे नुकसान कमी करणे, पाणी बिलात अचूकता आणणे, पुरवठा योग्य करणे आदींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यासाठी ३.९५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यामध्ये ओपा प्रकल्पाच्या पायाभूत सुविधा सुधारणे, जुने ट्रान्सफॉर्मर बदलणे, ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर करेक्शन (एपीएफसी) पॅनेल बसवणे आणि सिस्टम कार्यक्षमता वाढवणे इत्यादी कामे करण्यात आली आहेत.
दुसऱ्या टप्प्यात पणजीच्या पाणी व्यवस्थापन प्रणालीमध्ये १८ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल. यात ८ हजार अतिरिक्त स्मार्ट वॉटर मीटर बसवणे, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल पायाभूत सुविधांचे सुधारणे, रिअल-टाइम मॉनिटरिंग वाढवणे, जलद गळती शोधणे, सुधारित कार्यक्षमता आणि जलसंवर्धन सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे दरवर्षी १२.१९ कोटी लिटर पाण्याची बचत होण्याची अपेक्षा आहे. यामुळे दरवर्षी २.०३ कोटी रुपयांच्या महसुलात बचत होईल, अशी माहिती स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी दिली.              

हेही वाचा