क्रीडावार्ता : टीम इंडियावर धनवर्षा; बीसीसीआयने जाहीर केले ५८ कोटी रुपये रोख बक्षीस

भारताने न्यूझीलंडला हरवून १२ वर्षांनी जिंकले होते चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th March, 01:38 pm
क्रीडावार्ता : टीम इंडियावर धनवर्षा; बीसीसीआयने जाहीर केले ५८ कोटी रुपये रोख बक्षीस

मुंबई : ९ मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव केला. तब्बल १२ वर्षांनी भारताने पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी काबिज केली होती. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक बीसीसीआयने विजेत्यांवर मुक्तहस्ते बक्षिसांची उधळण केली आहे. अभूतपूर्व कामगिरी केलेल्या टीम इंडियाला ५८ कोटी रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. ही रक्कम, संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांमध्ये वाटली जाईल.

संघातील प्रत्येक खेळाडूला ३ कोटी रुपये, मुख्य प्रशिक्षकाला ३ कोटी रुपये आणि सहाय्यक प्रशिक्षकांना ५० लाख रुपये मिळतील. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये दिले जातील. निवड समितीच्या सदस्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये देखील मिळतील.

 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव केला. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर न्यूझीलंडने ५० षटकांत सात विकेट्स गमावून २५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४९ षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. रोहितने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. त्याने ७६ धावा करून भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.

भारताने त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले आणि सर्व सामने जिंकले. टीम इंडियाने बांगलादेशला ६ गडी राखून पराभूत करून स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर भारताने पाकिस्तानला ६ विकेट्सने आणि न्यूझीलंडला ४४ धावांनी हरवले. आणि उपांत्य फेरीत त्यांनी ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला.

आयसीसीने यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीस रकमेत ५३ टक्क्यांनी वाढ केली

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीस रकमेत ५३ टक्क्यांनी वाढ केली. विजेत्या भारतीय संघाला २.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे १९.५ कोटी रुपये मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एकूण बक्षीस रकमेत ६.९ दशलक्ष डॉलर्स (सुमारे 60 कोटी रुपये) वाढ केली आहे. विजेत्या संघाव्यतिरिक्त, उपविजेत्या न्यूझीलंड संघाला १.१२  दशलक्ष डॉलर्स (सुमारे ९.७२ कोटी रुपये) मिळाले, तर उपांत्य फेरीत बाहेर पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांना ५६,००० डॉलर्स (४.८६ कोटी रुपये) मिळाले.