प्रेमाचा अनोखा त्रिकोण ‘मेरे हसबंड की बीवी’
आज ओटीटी व चित्रपटगृहात साकिब सलीम आणि सबा आझाद यांचा ‘क्राइम बीट’, अॅनिमेटेड साय-फाय मालिका ‘पॅन्थियन सीझन २’ आणि अर्जुन कपूरचा ‘मेरे हसबंड की बीवी’ या सारखे अनेक चित्रपट, मालिका झळकणार आहेत.
मेरे हसबंड की बीवी । थिएटर
‘मेरे हसबंड की बीवी’ हा एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे. जो एका स्मृतिभ्रंशाने ग्रस्त तरुणाच्या अवतीभवती फिरतो. त्याची माजी पत्नी आणि त्याची हाेणारी पत्नी यांच्यातील एका मजेदार प्रेम त्रिकोणाची ही कथा आहे. मुदस्सर अझीझ दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
क्राइम बीट । झी ५
क्राइम बीट ही क्राइम थ्रिलर मालिका आहे. यामध्ये साकिब सलीम, सबा आझाद, राहुल भट, सई ताम्हणकर आणि आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही एका पत्रकाराची कथा आहे. जो एका गुन्ह्याचा शाेध घेता घेता मोठ्या संकटात सापडतो.
पॅन्थियन सीझन २ । नेटफ्लिक्स
अॅनिमेटेड साय-फाय शो पॅन्थियन दुसऱ्या सीझनसह परतला आहे. या मालिकेला केटी चांग, पॉल डॅनो, आरोन एकहार्ट, डॅनियल डे किम आणि टेलर शिलिंग यांनी आपला आवाज दिला आहे. हा शो दोन त्रासलेल्या अल्पवयीन मुलांवर केंद्रित आहे. ज्यांचे अपलोडेड इंटेलिजेंसशी संबंध आहेत. जे एक धोकादायक अॅप बनवतात आणि संपूर्ण जग संकटात सापडते.
बेबीगर्ल । थिएटर
निकोल किडमन आणि हॅरिस डिकिन्सन अभिनीत बेबीगर्ल एक कामुक थ्रिलर चित्रपट आहे. जी एका सीईओची कथा आहे. जिच्या अवैध संबंधांमुळे तिची कारकीर्द आणि तिचे कुटुंब संकटात सापडते.
डार्क नन्स । थिएटर
डार्क नन्स हा एक थ्रिलर भयपट आहे. दुष्ट आत्म्याने पछाडलेल्या एका लहान मुलाला वाचवण्यासाठी एक नन आपले सर्वस्व पणाला लावते. सॉन्ग हाय क्यो आणि जिओन येओ बीन या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. या शिवाय चित्रपटात ली जिन वूक आणि मून वू जिन यांच्या भूमिका देखील आहेत.
गेट सेट बेबी । थिएटर
उन्नी मुकुंदन त्याच्या आगामी ‘गेट सेट बेबी’ चित्रपटासह बॉक्सऑफिसवर त्याची हिट मालिका सुरू ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. निखिला विमलचीही भूमिका असलेल्या या विनोदी चित्रपटात मुकुंदन एका स्त्रीरोगतज्ज्ञाची भूमिका साकारत आहे. त्याच्या आयुष्यात एक छोटे बाळ येते आणि त्याचे आयुष्य उलथा पालथ होते.
कुछ सपने अपने । थिएटर
‘कुछ स्वप्न अपने’ चित्रपटात सात्विक भाटिया, अर्पित चौधरी, मोना आंबेगावकर आणि शिशिर शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा हृदयस्पर्शी चित्रपट एका समलैंगिक जोडप्यावर आधारित आहे, जे पालक आणि सामाजिक दबावांमध्ये त्यांचे नातेसंबंध टिकविण्यासाठी संकटांचा सामना करतात.
डाकू महाराज । नेटफ्लिक्स
'डाकू महाराज' चित्रपटाची कथा एका सरकारी अधिकाऱ्याभोवती फिरते. तो एका गुन्ह्यात सामील होतो आणि नंतर तो दरोडेखोर बनतो. काही वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर, तो तुरुंगातून पळून जातो आणि ड्रायव्हर म्हणून काम करतो, पण त्याचा भूतकाळ त्याला सोडत नाही.