डॅनियली हिच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला
मडगाव : ब्रिटिश, आयरिश नागरिक डॅनियली मॅकलॉग्लीन हिच्यावर लैंगिक अत्याचार करुन खून केल्याप्रकरणी आरोपी विकट भगत याला न्यायालयाकडून जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे. याशिवाय सश्रम कारावास व दंडही सुनावण्यात आलेला आहे.
मडगावातील दक्षिण गोवा सत्र न्यायालयात डॅनियली मॅकलॉग्लिन हिच्या खुनप्रकरणी खटला सुरू आहे. याप्रकरणी विकट भगत याला न्यायालयाकडून लैंगिक अत्याचार करणे, खून करणे व पुरावे नष्ट करणे या आरोपांखाली दोषी ठरवण्यात आलेले होते. याप्रकरणात ४६ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले होते. आरोपी विकट भगत याला न्यायालयाकडून खून प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेप व सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात जन्मठेप व ३५ हजारांचा दंड सुनावण्यात आला तर पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली २ वर्षे कारावास व १० हजारांचा दंड सुनावण्यात आलेला आहे.
काणकोण येथील राजबाग आगोंद येथे १३ मार्च २०१७ रोजी आयरिश नागरिक डॅनियलीचा खून झाला होता. खुनापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचारही झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले होते. या खुनामुळे विदेशातही याची चर्चा झाली होती. या प्रकरणात फिलोमिना कॉस्ता, तत्कालिन पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. काणकोण पोलिसांनी खुनाचा छडा लावून काणकोणातील भगतवाडा येथील संशयित विकट भगत याला अटक केली होती. त्यावेळी त्याचे वय २४ वर्षे होते. विकट व डॅनियली यांच्यात मैत्री होती. खुनानंतर डॅनियलीचा मोबाईलही चोरीला गेला होता. तिच्या अंगावर ७ जखमा होत्या असे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी संशयित विकटचे तुरुंगातील वर्तनही चांगले नसल्याने बेड्या घालून सुनावणीस आणण्याचा आदेश यापूर्वी न्यायालयाकडून दिलेला होता. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर ही सुनावणी सुरु होती. निवाड्याच्या सुनावणीला संशयित विकट याला प्रत्यक्ष हजर करण्यास सांगण्यात आलेले होते. त्यानुसार सोमवारीही पोलिसांनी आरोपी विकटला न्यायालयात हजर केले होते.
काणकोण पोलिसांनी यापूर्वी विकटवर न्यायालयात एकूण ३७४ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते व त्याच्यावर खून करणे, लैंगिक अत्याचार करणे, जबरी चोरी व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आदी कलमाखाली गुन्हा नोंद केलेला होता. सरकारी पक्षाच्या वकिलाने या खटल्याची सुनावणी जलदगतीने करावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सुनावणीला गती देण्यात आलेली होती.
डॅनियलीवरील अत्याचार व खूनप्रकरणी आरोपी विकट भगत याला दोषी ठरवण्यात आल्यावर डॅनियलीच्या कुटुंबीयांनी न्याय मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता आरोपीला शिक्षा सुनावतानाही डॅनियलीचे कुटुंबीय व मित्र यांची न्यायालयात उपस्थिती होती.
अॅड. विक्रम वर्मा यांनी सांगितले की, आरोपी विकट भगत याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली असून सश्रम कारावासाची शिक्षाही असल्याने आजन्म सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. यामुळे डॅनियली हिच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला असल्याची भावना आहे. आठ वर्षे या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. साक्षीदारांना शोधणे ही मोठी कठीण गोष्ट होती, पुरावे शोधण्यासाठी पोलिसांनी चांगले काम केलेले आहे. राज्याबाहेरील साक्षीदारांनाही शोधून न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले आहे. त्यासाठी तपास अधिकारी राजेंद्र प्रभूदेसाई व त्यांच्या सहकार्यांनी खूप परिश्रम घेतले. सरकारी वकील व्ही. जी. कॉस्ता, अॅड. देवेंद्र कोरगावकर व अॅड. संजय सामंत यांनीही चांगल्याप्रकारे बाजू मांडली. अभियोक्ता संचालक पूनम भरणे यांचेही आभार मानतो. या निर्णयामुळे आठ वर्षांच्या विलंबाने असेल पण डॅनियली हिच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला, असे वर्मा म्हणाले.