लवू मामलेदार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

कुटुंबीय, मित्रमंडळींसह राजकीय नेत्यांची उपस्थिती


16th February, 11:29 pm
लवू मामलेदार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कॅबचालकाने केलेल्या मारहाणीनंतर शनिवारी बेळगावात (कर्नाटक) मृत्यू पावलेल्या माजी आमदार लवू मामलेदार यांच्या पार्थिवावर रविवारी फोंडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रांतील लोकांनी मामलेदार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
खासगी कामानिमित्त बेळगाव येथे गेलेले लवू मामलेदार खडेबाजार येथील शिवानंद लॉजमध्ये वास्तव्यास होते. शनिवारी दुपारी त्यांच्या कारचा धक्का कॅबला बसला. त्यात कॅबचे मोठे नुकसान झाले नव्हते. मामलेदार यांनी माफी मागून लॉजचा रस्ता धरला. कॅबचालकाने पाठलाग करत लॉजच्या पार्किंग परिसरात पोहोचून मामलेदारांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यातून हे प्रकरण हातघाईवर आले. कॅबचालक अमिरसुहेल शकीलसाब सनदी (सुभाषनगर, बेळगाव) याने मामलेदार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर स्वतःला सावरत मामलेदार आपल्या खोलीत जाण्यासाठी निघाले असतानाच कोसळले. लॉज व्यवस्थापनाने त्यांना तत्काळ इस्पितळात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी संशयित अमिरसुहेल सनदी याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
शवविच्छेदनानंतर मामलेदार यांचा मृतदेह शनिवारी रात्री गोव्यात आणण्यात आला. रविवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
.........................
बॉक्स
मंत्री ढवळीकरांना अश्रू अनावर
लवू मामलेदार हे माझे चांगले मित्र होते. राजकारणात त्यांच्याशी मतभेद झाले, पण आमच्यात मनभेद नव्हते. मी माझ्या चांगल्या मित्राला गमावले, अशी प्रतिक्रिया देताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना अश्रू अनावर झाले होते.