१३ फेब्रुवारी रोजी १३०० प्रवाशांसह जाणार दुसरी रेल्वे
पणजी : महाकुंभसाठी प्रयागराजला जाणाऱ्या मोफत रेल्वे सेवेचा लाभ १८ ते ६० वर्षांपर्यंतच्याच गोमंतकीय नागरिकांना मिळणार आहे. १८ वर्षांखालील व ६० वर्षावरील कोणीही रेल्वेत प्रवेश केल्यास आर्थिक दंड ठोठावून त्याला नजीकच्या रेल्वे स्टेशनवर उतरवले जाईल. समाजकल्याण खात्यातर्फे देण्यात येणारे ओळखपत्र सक्तीचे असून प्रत्येकाने स्वत:च्या जबाबदारीवर मोफत रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.
१३ फेब्रुवारी रोजी दुसरी रेल्वे गेल्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी तिसरी रेल्वे जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत रेल्वे सेवेची माहिती दिली. दरम्यान, ६ फेब्रुवारी रोजी प्रयागराजला गेलेले ११९१ प्रवासी सुरूरूपपणे गोव्यात पोचले आहेत.
प्रयागराजला जाणारी दुसरी रेल्वे १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.४० वाजता मडगाव रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. १३०० प्रवाशांना घेऊन ही रेल्वे प्रयागराजकडे रवाना होईल. ही रेल्वे १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.२५ वाजता प्रयागराजला पोहचेल. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.५० वाजता परत मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. नाव व इतर माहिती असलेली ओळखपत्रे समाज कल्याण खात्यातर्फे दिली जातील. ही ओळखपत्रे नसलेल्यांना रेल्वेत प्रवेश दिला जाणार नाही. थंडी खूप असल्याने स्वेटर तसेच इतर सामान भाविकांनी आणायचे आहे.
परतीच्या प्रवासावेळी १८ फेब्रुवारी रोजी एक जेवण देण्यास रेल्वेने असमर्थता दर्शवली आहे. या जेवणाची व्यवस्था भाविकांना करावी लागेल. जातेवेळी फक्त रेल्वेत जेवण दिले जाईल. प्रयागराज ते संगम घाटापर्यंत जाते व येते मिळून ३० किमी अंतर आहे. हे अंतर चालण्याची तयारी भाविकांनी ठेवायला हवी. प्रयागराजला पोचल्यानंतर जेवण तसेच इतर खर्च भाविकाना करावा लागणार आहे. भाविकांची सुरक्षा, सामान तसेच आरोग्याची जबाबदारी सरकार घेणार नाही.