राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मॉडर्न पेंटाथलॉनमध्ये गाेव्याला चार पदके

बाबू गावकरला तीन पदके : गोव्याला एकूण सात पदके

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
08th February, 11:38 pm
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मॉडर्न पेंटाथलॉनमध्ये गाेव्याला चार पदके

पणजी : उत्तराखंड येथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय खेळांमध्ये शनिवारी मॉडर्न पेंटाथलॉनमध्ये गोव्याने चार पदके (३ रौप्य आणि १ कांस्य) पटकावली​.
शनिवार गोव्यासाठी हा एक उत्तम दिवस ठरला.गेल्या आवृत्तीतील सुवर्णपदक विजेता बाबू गावकरने तीन पदके (३ रौप्य) जिंकली. बाबूने लेझर रन वैयक्तिक पुरुष गटात रौप्य, हरिचंद्र वेळीप आणि सूरज वेळीपसह लेझर रन पुरुष सांघिक गटात रौप्य आणि नेहा गावकरसह लेझर रन मिश्र रिलेमध्ये आणखी एक रौप्य पदक जिंकले.नेहा गावकर, अंकिता वेळीप आणि वैष्णवी वडारसह लेझर रन महिलांच्या सांघिक गटात कांस्यपदक जिंकले.गोव्याने उत्तराखंड राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत सात पदके (२ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्य) जिंकली आहेत आणि गोवा सध्या पदक तालिकेत २४ व्या स्थानावर आहे.
स्पर्धेत गोव्याला दोन सुवर्णपदके
गोव्याने स्क्वॉश व योगासनमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. महिला स्क्वॉशमध्ये गोव्यासाठी आकांक्षा साळुंखेने सुवर्णपदक पटकावत स्पर्धेत गोव्याला पहिले पदक मिळवून दिले होते. याआधी २०२३ मध्ये गोव्यात झालेल्या ३७ व्या क्रीडा स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय योगासन स्पर्धेत शुभम देबनाथने पारंपरिक योगासनात सुवर्णपदक जिंकले. मूळचा पश्चिम बंगालचा असलेला शुभम आता गोव्याचे प्रतिनिधित्व करत आहे. गुरुवारी गोव्याच्या संघाने बीच व्हॉलीबॉल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. गोव्याने तेलंगणाच्या जोडीवर अटीतटीच्या लढतीत २-१ फरकाने मात करत कांस्य पदक पटकावले होते.