कोहलीचे पुनरागमन शक्य : राेहितचा फॉर्म चिंतेचा विषय
कटक : भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवारी दुसरा एक दिवसीय सामना कटक येथे रंगणार आहे. नागपूर येथील सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला ४ गड्यांनी पराभूत करत ३ एक दिवसीय सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे कटकचा सामना जिंकून भारत मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे इंग्लंडला पहिल्या वन-डेतील पराभव विसरून नव्या दमाने टीम इंडियाच्या आव्हानाचा मुकाबला करावा लागणार आहे.
नागपूरमध्ये झालेल्या सामन्यात शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि अक्सर पटेलने अर्धशतक झळकवून टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. गोलंदाजीत हार्षित राणा आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी ३ गडी बाद करून इंग्लंडला जखडून ठेवले होते. पण कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, के.एल.राहुल आणि हार्दिक पांड्या मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले होते.
विराट कोहलीचे कमबॅक होणार?
टीम इंडियाचा रनमशीन विराट कोहली पहिल्या वन-डेला मुकला होता, त्यामुळे कटक येथील सामन्यात त्याला संधी मिळते का ते महत्त्वाचे ठरणार आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराट फॉर्ममध्ये येणे टीम इंडियासाठी फायदेशीर ठरणार आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या ताफ्यात मॅच विनिंग इनिंग देणारे खेळाडू आहेत. पण कॅप्टन जॉस बटलरच टीम इंडियाचा खंबीरपणे मुकाबला करत आहे. पहिल्या वन-डेत फिल सॉल्ट आणि बेन डकेटने आक्रमक सुरुवात केली. पण मोठी धावसंख्या उभी करण्यात ते अपयशी ठरलेत. ज्यो रुट टीम इंडियाच्या बॉलर्सचा संघर्ष करताना दिसला. गोलंदाजीत इंग्लंडला पाहिजे तशी भरीव कामगिरी करता आली नाही. एकंदर टीम इंडिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंवर नजर टाकली तर टीम इंडियाचे पारडे नक्कील जड दिसत आहे.
कटकमध्ये भारताचा दबदबा
भारताने २००२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कटक येथे एकदिवसीय सामना गमावला होता. ज्यात भारताला चार विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. यानंतर, टीम इंडियाने गेल्या २३ वर्षांत कटकच्या मैदानावर ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. कटकचे मैदान भारतीय संघाचा अजिंक्य किल्ला आहे. जिथे विरोधी संघ भारताविरुद्ध पूर्णपणे पराभूत होतात.
टीम इंडियाने १९८२ मध्ये कटकच्या बाराबती क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला, जो भारताने पाच विकेट्सनी जिंकला. कटकच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात एकूण पाच एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने तीन तर इंग्लिश संघाने दोन सामने जिंकले आहेत.
टीम इंडियाने आतापर्यंत कटकच्या मैदानावर एकूण १७ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने १३ जिंकले आहेत आणि चार सामने गमावले आहेत. या मैदानावर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दोन आणि न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी एक वनडे सामने गमावले आहेत.रोहितने कटकमधील बाराबती स्टेडियमवर तीन सामने खेळले आहेत, जिथे त्याने ७१.५० च्या सरासरीने फक्त १४३ धावा केल्या आहेत. या काळात रोहितने दोनदा अर्धशतक झळकावण्यात यश मिळवले. हे आकडे पाहून त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. कटकची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजांना अनुकूल असते, त्यामुळे रोहितच्या बॅटवरून मोठी खेळी दिसून येऊ शकते. जर तो हे करण्यात यशस्वी झाला तर चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याच्यासाठी आणि टीम इंडियासाठी ते चांगले होईल.
रोहितला विक्रम करण्याची संधी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याच्या जवळ असल्याने त्याला कटकमध्ये मोठा विक्रम करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सचिन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ३४६ सामन्यांमध्ये १५३३५ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, रोहितने आतापर्यंत ३४२ सामन्यांमध्ये ४५.२२ च्या सरासरीने १५२८५ धावा केल्या आहेत. अशाप्रकारे, सचिनला मागे टाकण्यासाठी रोहितला ५१ धावांची आवश्यकता आहे.
जडेजाला स्टार्कला मागे टाकण्याची संधी
आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाजांनी इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आहे, यात रवींद्र जडेजाचाही समावेश आहे. जडेजाने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध २७ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २३.२८ च्या सरासरीने एकूण ४२ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत जडेजा सध्या पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेट घेऊन जडेजाने टिम साउदी, शॉन पोलॉक आणि माल्कम मार्शल यांना मागे टाकले. आता जडेजाकडे चौथ्या क्रमांकावर असलेल्या मिचेल स्टार्कला मागे टाकण्याची संधी आहे. स्टार्कने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात एकूण ४३ विकेट्स घेतल्या आहेत. जर कटकमध्ये होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जडेजाने आणखी २ विकेट्स घेतल्या तर तो या यादीत स्टार्कला मागे टाकेल.
भारताचा संभाव्य संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी
आजचा सामना
भारत वि. इंग्लंड
वेळ : दु. १२.३० वा.
स्थळ : बाराबती क्रिकेट स्टेडियम, कटक
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिझ्ने+हॉटस्टार