गोव्याच्या बीच व्हॉलिबॉल संघाला कांस्यपदक

उत्तराखंड राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : गोव्याच्या खात्यात तीन पदके

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th February, 10:20 pm
गोव्याच्या बीच व्हॉलिबॉल संघाला कांस्यपदक

पणजी : उत्तराखंड येथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या बीच व्हॉलिबॉल संघाला कांस्यपदक प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत गोव्यात २ सुवर्णपदकांसह एका कांस्यपदकांची कमाई करत पदकांची एकूण संख्या ३ केली आहे.

गोव्याच्या कांस्यपदक विजेत्या संघात रामा धावस्कर आणि नितीन सावंत या खेळाडूंचा समावेश होता. याशिवाय संघासोबत प्रशिक्षक प्रल्हाद धावस्कर व प्रशिक्षक सूर्या सावंत यांची उपस्थिती होती.

बीच व्हॉलिबॉल स्पर्धा उत्तराखंडमधील तेहडी येथील शिवपुरी नदीच्या किनारी झाली. गुरुवारी सकाळी तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत गोव्याने तेलंगणाच्या जोडीवर अटीतटीच्या लढतीत २-१ फरकाने मात केली. गोव्याचे हे स्पर्धेतील अधिकृत तिसरे पदक ठरले.

स्पर्धेत गोव्याला दोन सुवर्णपदके

गोव्याने स्क्वॉश व योगासनमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. महिला स्क्वॉशमध्ये गोव्यासाठी आकांक्षा साळुंखेने सुवर्णपदक पटकावत स्पर्धेत गोव्याला पहिले पदक मिळवून दिले होते. याआधी २०२३ मध्ये गोव्यात झालेल्या ३७ व्या क्रीडा स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय योगासन स्पर्धेत शुभम देबनाथने पारंपरिक योगासनात सुवर्णपदक जिंकले. मूळचा पश्चिम बंगालचा असलेला शुभम आता गोव्याचे प्रतिनिधित्व करतो.