नृत्य विविधतेमध्ये एकतेचे प्रतिक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : लोकोत्सव २०२५ चे उद्घाटन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th January, 12:29 am
नृत्य विविधतेमध्ये एकतेचे प्रतिक

पणजी: भारतातील राज्यांच्या भाषा आणि नृत्ये वेगवेगळी आहेत. पण लोकाेत्सवात एकाच मंचावर सर्व देशांची नृत्य सादर होतात. नृत्य हे विविधेमध्येही एकतेचे प्रतिक आहे. तसेच भाजप सरकारही एकतेचा संदेश देते, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पणजी कला अकादमीच्या दर्या संगमवर लोकोत्सव २०२५ चे उद्घाटन मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील बन्सल, कला आणि संस्कृती संचालक सगुण वेळीप आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना नृत्याने झाली.उद्घाटनानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, पेडणे ते काणकोणपर्यंत वेगवेगळे महोत्सव आयोजित केले गेले आहेत. म्हणून, स्टेजवर नृत्य करणे गोव्यातील लोकांसाठी कठीण नाही. लोकोत्सव देशभरात प्रसिद्ध झाला असल्याने, प्रत्येकाने लोकोत्सवाला भेट दिली पाहिजे. येथील मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासोबतच तुम्ही खरेदीही करू शकता.भारतातील राज्यांच्या भाषा आणि नृत्ये वेगवेगळी असली तरी आपण भारतीय एक आहोत. कलाकारांना भाषेची आवश्यकता नसते. लोकोत्सवात एकाच मंचावर नृत्य सादर करून आपण दाखवतो की आपले भारतीय नाते एकमेकांशी जोडलेले आहे. गुजरात, राजस्थान आणि मणिपूरसारखी अनेक राज्ये यामध्ये सामील होत आहेत. त्यांना हे गोव्याने उपलब्ध करून दिले आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी लोककलांना दिले जागतिक व्यासपीठ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतातील सर्व क्षेत्रांना, विशेषतः संस्कृतीला जागतिक पातळीवर नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जी-२० दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोककलांना जागतिक व्यासपीठ दिले. आपली अनोखी लोककला केवळ दिल्लीतच नव्हे तर इतर राज्यांमध्येही सादर केली गेली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकाेत्सवाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील बन्सल व इतर. (नारायण पिसुर्लेकर)