सोपो कर गोळा करण्यासाठी नवी निविदा ३१ जानेवारीआधी
मडगाव : एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केट इमारतीचे काम आता पूर्णत्वास आलेले आहे. आणखी १५ ते २० दिवसांच्या कालावधीत त्या मार्केट इमारतीचे उद्घाटनही केले जाईल. याशिवाय सोपो निविदेतील अटी बदलून नवी निविदा ३१ जानेवारीच्या आधी जारी केली जाईल, अशी माहिती एसजीपीडीएचे अध्यक्ष दाजी साळकर यांनी दिली.
एसजीपीडीएची सर्वसाधारण सभा शुक्रवारी सकाळी एसजीपीडीएच्या हॉलमध्ये झाली. एसजीपीडीएचे अध्यक्ष दाजी साळकर यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटची प्रलंबित सोपो निविदा जारी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
याआधी एकदा सोपो निविदा जारी करण्यात आली होती. मात्र, त्यातील मच्छीमार व्यवसाय काम केलेली व्यक्ती असावी, यासारख्या काही अटी या बोलीदारांना जाचक असल्याचे दिसून आले. हे लक्षात आल्यानंतर निविदा रद्द करण्यात आली व अटींमध्ये बदल करण्यात आला आहे.
सोपो करासाठीची किंमत ही ४ कोटींचा अंदाज बांधून घालण्यात आली होती. मात्र आता ही रक्कम ३ कोटींवर आणण्यात आली आहे. आता रक्कम बदलेली नवी सोपो निविदा ३१ जानेवारीपर्यंत जारी करण्यात येईल. त्यानंतर घाऊक मासळी मार्केटच्या सोपो निविदेसाठी इच्छुकांना अर्ज सादर करता येईल असे साळकर म्हणाले.
एसजीपीडीएचे ढवळी येथे ३६ प्लॉटस असून ते अनेक वर्षांपासून वापराविना पडून आहेत. या प्लॉटसचा लिलाव करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्यानुसार त्यातील १५ प्लॉट पहिल्या टप्प्यात लिलावासाठी घेण्यात येतील. त्यानंतर उर्वरित प्लॉट लिलावासाठी घेण्यात येणार आहेत.
एसजीपीडीए मैदानावर पे पार्किंग
एसजीपीडीएच्या मैदानावर अनेक गाड्या पार्क केल्या जात आहेत. त्याचा कोणताही फायदा एसजीपीडीएला होत नाही. त्यामुळे आता तासाला दहा रुपये, दिवसभरासाठी ५० रुपये अशा दराने काही जागेवर पे पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
एसजीपीडीएच्या किरकोळ मासळी मार्केटमध्ये विक्रेते दिवसाला दहा रुपये भाडे देत आहेत. या दहा रुपयांच्या करातून देखभाल दुरूस्तीचे काम करणे कठीण जात असल्याने आता भाड्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे अध्यक्ष दाजी साळकर यांनी सांगितले.
वाद लवकरच मिटेल ः साळकर
एसजीपीडीएच्या मार्केटकडील पेव्हर्स घालण्यात आलेली जागा ही एसजीपीडीएची असून त्यावर मागील अनेक वर्षांपासून एसजीपीडीए ठेकेदार सोपो गोळा करत आहे. आता पालिकेने नव्याने नियुक्त केलेला ठेकेदार याठिकाणी सोपो गोळा करत असल्याने हा वाद झाला. हा वाद जिल्हाधिकार्यांकडे पोहोचलेला असून लवकरच यावर योग्य उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती अध्यक्ष दाजी साळकर यांनी दिली.