मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विद्यार्थ्यांना संबोधन
पणजी: हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या गोव्यातील मुलांनी मनोहर पर्रीकर व्याज मुक्त कर्ज योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेअंतर्गत हार्वर्ड विद्यापीठाचा संपूर्ण शिक्षण खर्च समाविष्ट केला जाईल. विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्यानंतर हे कर्ज फेडण्याची तरतूद असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
उच्च शिक्षण संचालनालय आणि राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ (एससीआरटी) यांनी हार्वर्ड विद्यापीठासहित १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोग्राम फोर सायन्टीफीक इन्सपायरड लिडरशीप (पीएसआयएल) लागू करण्यात आला आहे. गोव्यातील विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व कौशल्ये विकसित करण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठ भाषा आणि ज्ञान प्रशिक्षण प्रदान करणार आहे.
या कार्यक्रमात गोव्यातील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचा समारोप समारंभ शुक्रवारी तिसवाडी गोव्यातील वेल्हा पिलर पिलग्रिमेज सेंटर येथे पार पडला. याप्रसंगी प्रमोद सावंत बोलत होते.
यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, उच्च शिक्षण संचालक भूषण सावयकर, शिक्षण संचालक शैलेशझिंगडे, हार्वर्ड विद्यापीठाचे डॉमिनिक माऊ आणि अँड्र्यू राईट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात चमकदार कामगिरी करावी. यासाठी कोणते क्षेत्र निवडायचे हे त्यांनी ठरवणे महत्त्वाचे असते. तुमच्या आवडी ओळखून आणि त्यांचा विचार करून तुमचे क्षेत्र निवडणे खूप महत्त्वाचे असल्याचेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
कर्जाद्वारे मिळणार कॉलेजची संपूर्ण फी
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जर हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी लागणारे शुल्क हे सर्वसामान्यांना परवडणारे नसते, मात्र याकामी सरकारही मदत करणार आहे.
मनोहर पर्रीकर व्याज मुक्त कर्ज योजना ही पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना व्याज न आकारता कर्ज देते. मुलांच्या पालकांना हे शिक्षण देणे परवडणार नसेल तर त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
संपूर्ण कॉलेज फी कर्जाच्या अंतर्गत उपलब्ध असून हार्वर्डसह जगभरातील ५०० विद्यापीठांचा या योजनेत समावेश आहे. विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी कर्ज फेडावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.