व्हिडिओ व्हायरल करणे अंगलट
म्हापसा : करासवाडा-म्हापसा येथील उड्डाणपुलाखाली सेवा बजावताना वैयक्तिक रागातून वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील गावस यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित आरोपी राहुल राजन सावंत (२१, रा. माडेल थिवी) यास अटक केली. राहुलने याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल केला होता.
पोलिसांनी संशयित राहुलविरूद्ध बुधवारी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ३५१(३), १३२ अंतर्गत गुन्हा नोंद केला. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करून संशयिताला पकडून ताब्यात घेतले व त्यास रितसर अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, ही घटना १० रोजी संध्याकाळी घडली होती. फिर्यादी वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल हे घटनास्थळी आपले कर्तव्य बजावत होते. त्यावेळी संशयित तिथे आला. त्याने वैयक्तिक रागातून फिर्यादीला शिवीगाळ करीत धमकी दिली. हा व्हिडिओ आपल्या मोबाईलवर काढला आणि नंतर वायरल केला होता.