पाच जणांना अटक : नवीन बस स्थानकावर पोलिसांचा छापा
म्हापसा : येथील पोलिसांनी ड्रग्ज विरोधी कारवाईअंतर्गत १० लाखांचा १०.३०० किलोग्रॅम गांजा जप्त करून पाच संशयितांना अटक केली. म्हापसा नवीन कदंब बस स्थानकावर पोलिसांनी हा छापा टाकला.
चंदनकुमार मोहन मिस्त्री शर्मा (२२), रोहित रामराज विश्वकर्मा शर्मा (२१), इमित्या मुस्लिम अन्सारी (२१) सर्व पलामू झारखंड आणि विजय प्रदीप वळवईकर (२५, रा. वागाळी कामुर्ली) व परशुराम शंकराप्पा लमाणी (३६, रा. हाउसिंग बोर्ड कामुर्ली) यांचा अटक केलेल्या संशयितांमध्ये समावेश आहे.
गुरुवारी १२ रोजी दुपारी ३.२५ ते संध्याकाळी ६ च्या दरम्यान पोलिसांनी हा छापा टाकला. म्हापसा नवीन कदंबा बस स्थानकावर ड्रग्सचा विक्री व्यवहार होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलीस पथकाने संशयित आरोपींना रंगेहाथ पकडले.
संशयित चंदनकुमार, रोहित व इमित्या हे तिघे १० किलो ३०० ग्रॅमचा गांजा घेऊन बस स्थानकावर उतरले होते. तर हा गांजा संशयित विजय वळवईकर व परशुराम लमाणी हे ताब्यात घेण्यासाठी आले होते. त्याचवेळी पोलिसांनी पाचही संशयितांना पकडून हा गांजा जप्त केला.
पोलीस निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर, अजय धुरी, बाबलो परब, आदित्य गाड, विशाल कुट्टीकर, दत्तप्रसाद पंडित, हवालदार सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल राजेश कांदोळकर, अक्षय पाटील, विनय हिरोजी, प्रकाश पोळेकर, सिध कांबळी, दत्ता गडेकर व आनंद राठोड या पथकाने केली. पुढील तपास पोलीस अधीक्षक अक्षत कौशल व उपअधीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.