लवकरच महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अधिकृत घोषणेची शक्यता
मुंबई: महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी जोर- बैठका सुरु आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये खाते वाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. खातेवाटपाच्या चर्चेसाठी महायुती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गेले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत दोघांचीही बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत तोडगा काढला असून मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही जवळपास निश्चित झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला २०, शिवसेना शिंदे गटाला १२ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला १० जागा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर १४ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशीही माहिती समोर आली आहे. या फॉर्म्युल्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. आता खाते वाटप कसे होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गृहमंत्रीपद, गृहनिर्माण, महसूल, सामान्य प्रशासन, कायदा व न्यायव्यवस्था, ग्रामविकास, वीज, पाणी, आदिवासी कल्याण, ओबीसी आणि तंत्रशिक्षण आदी खाती भाजप स्वत:कडे ठेवू शकते. तर शिवसेनेच्या वाट्याला नगरविकास, शालेय शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम आदींचा समावेश असू शकतो. तर राष्ट्रवादीला अर्थ, कृषी आणि महिला व बालकल्याण ही खाती मिळू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.