सनबर्नला धारगळ पंचायतीने दिलेल्या तत्त्वत: मंजुरीला उच्च न्यायालयात आव्हान

मंजुरी रद्द करण्याची याचिकेत मागणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th December, 12:12 am
सनबर्नला धारगळ पंचायतीने दिलेल्या तत्त्वत: मंजुरीला उच्च न्यायालयात आव्हान

पणजी : धारगळ-पेडणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या सनबर्न इलेक्ट्रॅानिक म्युझिक फेस्टिव्हलला नागरिकांचा विरोध असताना धारगळ पंचायतीने तत्वत: ना हरकत दाखला दिला. याला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत मंजुरी रद्द करण्याची मागणी केली आहे. यात भ्रष्टाचार झाल्याचा दावा करून सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ रोजी होणार आहे.

या प्रकरणी भरत बागकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी राज्य सरकार, धारगळ पंचायत आणि स्पेसबाऊंड वेब लॅब प्रा. लि. यांना प्रतिवादी केले आहे. यापूर्वी याचिकादाराने सनबर्न संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून धारगळ गावात दारू तसेच इतर प्रतिबंधित पदार्थांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली होती. तसेच इतर मुद्दे उपस्थित केले आहेत. या याचिकेची पुढील सुनावणी ९ रोजी होणार आहे. दरम्यान, पंचायतीने सनबर्नबाबत आयोजित केलेल्या ग्रामसभेत नागरिकांनी विरोध केला असताना, २ डिसेंबर रोजी आयोजीत पंचायतीच्या बैठकीत ठराव घेऊन ५ विरुद्ध ४ मतांनी तत्वत: ना हरकत दाखला मंजूर करण्यात आला. या प्रकरणी सरपंच सतीश धुमाळ, उपसरपंच दीप्ती नारोजी, अर्जुन कानुळकर, दाजी शिरोडकर, उत्तम वीर यांनी मतदान केले. तर भूषण नाईक, अनिकेत साळगावकर, अमिता हरमलकर आणि प्रीती कानुळकर यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले.

दरम्यान, याची दखल घेऊन तसेच वरील मंजुरीसाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला. या प्रकरणी पंचायतीने दिलेली मंजुरी रद्द करण्याची मागणी केली. तसेच सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी)चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

सनबर्न विषयी धारगळ पंचायतीने निर्णय घ्यावा : खंवटे

सनबर्नबाबतचा निर्णय धारगळ पंचायतीच्या कोर्टात ढकलल्यानंतर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या विषयावर मौन बाळगले. या मुद्द्यावरून पंचायतीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. हा गोंधळ मिटल्यानंतर पर्यटन खात्याकडे हा विषय आल्यावर आपले म्हणणे मांडणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले.


हेही वाचा