गोव्याचा नागालँडवर मोठा विजय

फेलिक्स आलेमावची हॅट्ट्रीक : दर्शन मिशाळच्या ९१ धावा

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
05th December 2024, 11:19 pm
गोव्याचा नागालँडवर मोठा विजय

हैदराबाद : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ग्रुप स्टेजचे सामने सुरू आहेत. शुक्रवार ५ रोजी गोव्याच्या फेलिक्स आलेमावने नागालँडविरुद्ध घातक गोलंदाजी केली. त्याने हॅट्ट्रीकसह ४ षटकात ६ च्या इकॉनॉमीमध्ये फक्त २४ धावा देत ५ बळी घेतले आणि आपल्या संघाला विजयाकडे नेले.
फेलिक्स आलेमावने सामन्याच्या शेवटच्या तीन चेंडूंवर हॅट्ट्रिक केली. वास्तविक नागालँडने हा सामना गमावला होता. त्यांना शेवटच्या षटकात ११६ धावा करायच्या होत्या, जे अशक्य काम होते. त्यामुळे या सामन्यात केवळ औपचारिकता उरली होती. दरम्यान, फेलिक्सने शेवटच्या षटकात हॅट्ट्रिक घेत खळबळ उडवून दिली. त्याने पहिल्या तीन चेंडूंवर ८ धावा दिल्या आणि त्यानंतर उरलेल्या ३ चेंडूत ३ बळी घेतले.या सामन्यात गोव्याने नागालँडचा १०८ धावांनी पराभव केला.
नागालँडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी घातक ठरला. त्याच्या गोलंदाजांना गोव्याच्या फलंदाजांनी चांगलाच फटकारले. गोव्याच्या दर्शन मिसाळने केवळ ३१ चेंडूत २९३ च्या स्ट्राईक रेटने ९१ धावा केल्या. यादरम्यान दर्शनने ७ चौकार आणि ८ षटकारही मारले. तर सुयश प्रभुदेसाईने २०९ च्या स्ट्राईक रेटने ३३ चेंडूत ६९ धावांची तुफानी खेळी केली. या दोघांच्या या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर गोव्याने २० षटकांत २३७ धावांची मोठी मजल मारली. त्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नागालँड संघाला २० षटकांत केवळ १२९ धावा करता आल्या. दर्शन मिशाळला सामनावीर घोषित करण्यात आले.