घरात एखादी तरी अशी व्यक्ती हवी. सगळीजणं जर मनाला कुरवाळत असतील, तर ते मन लाजाळूसारखं होतं. हलकीशी वाऱ्याची झुळूक आली की लगेच पानं मिटतात तसंच काहीसं.
‘किती गंजले आहे हे गेट! दुरुस्त का करत नाही?’ गेट व्यवस्थित न उघडण्याच्या त्रासाला वैतागून ती स्वत:शीच बोलत गेट उघडून आत आली. दहा पावले चालते न चालते तोच तिच्या कानावर शब्द पडले - “आम्ही लहान असताना आमच्यावर ओरडायचीस शिस्तीत वागा म्हणून. कधी काही प्रेमाने समजुतीने सांगितलं नाहीस. आता तुला मात्र आम्ही प्रेमाने बोलावसं वाटतं. कसं जमेल? आई म्हणून तू कशी वागलीस ते आठव आणि आमच्या वागण्याचा अर्थ लाव.”
ती हबकून जागच्या जागीच थांबली. दोन सेकंद दीर्घ श्वास घेऊन मागे फिरली. परत गेटकडे येऊन कट्ट्यावर बसली वातावरण निवळण्याची वाट बघत.
एरवी फोन करून जाणारी ती आज अचानक निघाली होती. खूप दिवस बयोचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता. आज जाईन, उद्या जाईन, फोन करेन असं म्हणत राहिली. संसाराचा रहाटगाडगा हरकत राहिली. पण सकाळी सकाळी पडलेल्या स्वप्नाने ती फोन न करता सकाळची कामं आवरून पाच मिनिटं थांबून परत निघेन संध्याकाळपर्यंत असा प्रवासातल्या वेळेचं गणित मांडत निघाली होती.
बयो म्हणावी तर ना नात्यातली ना गोत्यातली. पण तिच्याबद्दल मनात नेहमीच आदर असणारी. बयोच्या घरातून असे शब्द कानावर पडतील असा स्वप्नातही तिने विचार केला नव्हता. वस्तूस्थिती मात्र वेगळी होती. बयोची दोन्ही मुलं आणि ती एकत्र लहानाची मोठी झाली.
शाळेपासून ते पदवीपर्यंतचं शिक्षण बरोबरच झालेलं. बयोची मुलगी तिच्या बरोबरची आणि मुलगा दोन वर्षांनी लहान असल्यामुळे मागच्या वर्गात. शेजारी शेजारी म्हणावीत अशी घरं. अनोळख्या व्यक्तीला सख्खी भावंडं आहेत असं वाटे. मुलं हा बयोचा अभिमान होता. मुलांनी शिस्तबद्ध वागावं यासाठी बयोचा स्वभाव जरा अतितापट व्हायचा. पण मुलांच्या भल्यासाठीच असे. ती स्वतःच्या आईला घाबरत नसे. पण बयोला समजलं तर आपली काही खैर नाही या विचाराने तिने कधीच चूकीचं वावगं किंवा बेशिस्त वागायचं धाडस केलं नाही.
आज मात्र बयोच्या म्हातारपणात तिची ही अवस्था आणि पोटच्या मुलाने ऐकवलेली वाक्यं तिचं मन पोखरून काढत होती. पर्समधून पाण्याची बाटली काढून तिने घोटभर पाणी पिलं. नंतर पर्समधून फोन काढला आणि थोडे अंतर चालून गेली. फर्लांगभर चालल्यावर भावाला फोन केला. “अरे मी वाटेत थांबलेय. न्यायला येशील का? थकायला झालंय.
उन्हाची आलेय ना चालत. घरी असशील तर ये म्हणून सांगायला फोन केला.” “हो आहे घरी. येतो पाच मिनिटांत.” असं म्हणत त्याने फोन ठेवला.
भावाशी काय बोलायचं याचा विचार करत ती बसली. भाऊ पाच मिनिटात पोहोचल्यावर ती म्हणाली “बसूया का रे थोडा वेळ इथं? छान वाटतं मोकळ्या हवेत.” “हो बसूया ना. तसंही मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. आज थोडे वादविवाद झाले घरात. तुला फोन करणार होतो बयोबद्दल सांगायला. पण तू आलीस बरं झालं. आता सविस्तर बोलता येईल.” “हम्म... बोल ऐकतेय.” “अगं काही नाही. बयोचं म्हातारपण! पण सगळं शिस्तीत व्हावं हा अट्टाहास. अजून स्वभावात, वागण्यात काही बदल नाही. जागेवर पडलीय पण सगळं काही आधी होतं तसं व्हायला हवं. नाहीतर सुरू आख्यान. काम करून दमून आलो, तर घरी दोन मिनिटं शांतता नाही. मग वैताग येतो.”
“बोलत रहा... ऐकतेय मी.”
“काय बोलणार? झालं सांगून. तू बोल. तुला काही नवीन नाहीत या गोष्टी.”
“अरे हो, खरं सांगू? मी ऐकलं तुझं बयोशी झालेलं बोलणं मगाशी. पण घरच्या वादात मी काय बोलणार आणि सासरी गेलेले मी. तसंही सख्खं नातं नाही आपलं. मानलेली भावंडं आम्ही. काही मर्यादा आहेत म्हणून न बोलता माघारी फिरले व इथे येऊन तुला फोन केला.”
“एवढंच सांगेन, बयो असेल चिडकी, रागीट, तापट अतिशिस्तीची. पण आपण जे काही आहोत ते तिच्यामुळेच. कुठच्याही परिस्थितीत आपण तरून आजपर्यंत वर आलो ते लहानपणीच्या बयोनं लावलेल्या शिस्तीमुळेच. बयोची शिस्त लावण्याची पद्धत, समजावण्याची पद्धत चुकीची असेल. पण घरात एखादी तरी अशी व्यक्ती हवी. सगळीजणं जर मनाला कुरवाळत असतील, तर ते मन लाजाळूसारखं होतं. हलकीशी वाऱ्याची झुळूक आली की लगेच पानं मिटतात तसंच काहीसं. या मनाला कणखर बनवण्यासाठी बयोसारखी माणसं आजूबाजूला हवीत. आजही तुझं घर स्वच्छ टापटीप आहे ते बयोमुळेच. नाहीतर अव्यवस्थितपणा यायला वेळ लागणार नाही. मी नेते बयोला काही दिवस माझ्या घरी. मग कळेल तुला... आई आहे ती. तुच जर असं बोललास तर तुझ्या मुलांवरही तेच बिंबवलं जाईल आणि तुझी मुलं उद्या तसंच बोलतील. बघ विचार कर आणि ठरव. म्हातारपण हे दुसरं बालपण असतं रे. समजून घ्यायचं आणि जमेल तसं करायचं. शेवटी शब्दानं शब्द वाढवत गेलास तरी करायचं आहे तुलाच. मग न बोलता शांत राहीलास तर तुझ्यासाठीच चांगलं आहे. चल जाऊया घरी. बयोला बघायला आलेले. लगेच निघणार मी. पोचायला हवं घरी. माझाही संसार आहे. बयो ओरडायच्या आधी संसार सांभाळायला पोचायला हवं वेळेत.”
मंजिरी वाटवे