बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर काही दिवसांनी गुन्हे शाखेने एसआरए प्राधिकरणाकडून (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) वांद्रे येथे सुरू असलेल्या एसआरए प्रकल्पांची माहिती मागवली होती.
मुंबई : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आतापर्यंत सलमान खानशी असलेल्या त्यांच्या जवळच्या संबंधांबाबतच चर्चा केले गेली. दरम्यान या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी एक जुने प्रकरण उकरून काढले आहे. मुंबई गुन्हे शाखेने आता एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) प्रकल्पाच्या अनुषंगातून या हत्येचा तपास सुरू केला आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर काही दिवसांनी गुन्हे शाखेने एसआरए प्राधिकरणाकडून वांद्रे येथे सुरू असलेल्या एसआरए प्रकल्पांची माहिती मागवली होती. आता एसआरएने गुन्हे शाखेने मागितलेली माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याने वडिलांच्या हत्येमागे एसआरए प्रकल्पातील वादाचे कारण असल्याचे संकेत दिले होते.
गुन्हे शाखेने एसआरए अधिकाऱ्यांना पत्र पाठवले होते. यामध्ये वांद्रे परिसरात सुरू असलेल्या सर्व एसआरए प्रकल्पांची सविस्तर माहिती मागविण्यात आली होती. एसआरए अधिकाऱ्यांनी त्यास प्रतिसाद दिला व प्रस्तावित क्षेत्रातील सर्व प्रकल्पांची माहिती यंत्रणांना देण्यात आली. आता या प्रकल्पाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे बाबाच्या हत्येपूर्वी काही महिन्यांपासून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील संत ज्ञानेश्वर नगर आणि भारत नगर या दोन झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना विरोध करत होते. कारण येथे राहणाऱ्यांना नेमक्या कशाप्रकारे नवीन घरे दिली जातील याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. बिल्डर लॉबीने या विरोधातूनच बाबा सिद्दीकी यांची हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून मुंबई पोलीस तसेच गुन्हे शाखेने देखील त्याच अनुषंगाने तपासचक्रे गतिमान केली आहेत.