बार्देश : कामुर्ली कोमुनिदाद जमिनीसंदर्भात प्रशासकांनी दिलेली एनओसी मागे

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
04th November, 05:45 pm
बार्देश : कामुर्ली कोमुनिदाद जमिनीसंदर्भात प्रशासकांनी दिलेली एनओसी मागे

म्हापसा : अब्दुल रहमान लतीफ शेख यांना कोमुनीदादच्या सुमारे ४.१० लाख चौरस मीटर जमिनीच्या म्यूटेशनसाठी जारी केलेला ना-हरकत दाखला  उत्तर गोवा प्रशासक पांडुरंग गाड यांनी मागे घेतला. अब्दुल रहमान लतिफ शेख हे कामुर्ली कोमुनिदादचे गावकार नसल्याचे निरीक्षण नोंदवत त्यांनी हा निर्णय घेतला आहे . सदर जमीनीबाबत ना हरकत दाखला देताना फसवणूक झाल्याचे सांगत कोमुनिदाद समिती आणि गावकारांनी आक्षेप घेत मुख्यमंत्री व सरकारी यंत्रणांकडे तक्रार केली होती.

सरकारच्या पूर्वसंमतीशिवाय या जमिनीसाठी ना हरकत दाखला जारी करण्यात आला होता. कोमुनिदादच्या मालकीची जमीन कमी होईल या पद्धतीने सर्वे नोंदणीत एखाद्याचे नाव समाविष्ट करण्याचा अर्ज आल्यास त्यावर सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय  विचार करू नये. तसेच महसूल खात्याकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत  मामलेदारांना पत्र पाठवल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पाडण्यात यावी असे परिपत्रक २०२३ साली सरकारने जारी केले होते. याचप्रमाणे गावच्या गावकारांव्यतिरिक्त अन्य कुणाचेही नाव कोमुनीदादच्या मालकीच्या जमिनीच्या नोंदीत समाविष्ट करण्याची तरतूद कोमुनिदाद कायद्यात नाही आणि असा ना हरकत दाखला त्यानुसार देता येत नाही. याच आधारे शेख यांना जारी केलेला दाखला मागे घेण्यात येत असल्याचे कोमुनीदाद प्रशासकाने म्हटले आहे. 

दरम्यान, १४ ऑक्टोबर रोजी तत्कालीन उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक दीपक वायंगणकर यांनी हा नारकत दाखल जारी केला होता. कामुर्ली गावातील सर्व्हे क्र.१३५/० , १३६/० व १३९/०  यातील कोमुनिदादच्या मालकीच्या ४,१०,८२५ चौ.मी. जमिनीचे म्युटेशन करण्यास अब्दूल रेहमान लतिफ शेख यांना मान्यता देण्यात येत असून, मामलेदार कार्यालयातून म्युटेशनची प्रक्रिया पुढे नेण्यात हरकत नाही असे या ना-हरकत दाखल्यात म्हटले आहे. 

दरम्यान कोमुनीदादचे  मुखत्यार हरी प्रभू यांच्या नेतृत्त्वाखाली कोमुनिदाद समितीने २५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, थिवीचे आमदार, महसूल सचिव, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, दक्षता संचालक, बार्देश मामलेदार, कोमुनीदाद प्रशासक तसेच कोलवाळ पोलिसांकडे याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. तसेच गावकार बाबलो शंकर नाईक यांनी हा जमीन बलकावण्याचा प्रकार असल्याचे म्हणत याबाबत दक्षता खात्यात तक्रार नोंदवली आहे.   

उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांमार्फत जारी केलेल्या या फसव्या  ना-हरकत दाखल्याचा कोणत्याही म्यूटेशनसाठी विचार करु नये, अशी विनंतीही कोमुनिदादने केली होती. ना हरकत जारी केलेल्या जमिनीच्या एक -चौदाच्या उतार्‍यामध्ये ही सदर जमीन फक्त कोमुनिदादच्या मालकीचीच  असल्याचे नमूद  आहे. परंतु १९ ऑगस्ट २०२२ रोजी चिखली-कोलवाळ येथील रहिवासी असलेले अब्दुल रहमान लतीफ शेख यांनी या मालमत्तेच्या एक-चौदाच्या उताऱ्यामध्ये आपल्या नावाची नोंद व्हावी यासाठी कोमुनिदाद प्रशासकाकडे ना हरकत दाखल्यासाठी अर्ज केला होता. यासाठी संबंधिताने इच्छापत्र व  त्सम कागदपत्रे जोडली होती. त्यानुसार कोमुनिदाद प्रशासकांनी त्यांच्या बाजूने आदेश दिला. मात्र हे इच्छापत्र २०१९ मध्ये न्यायालयाने रद्द केल्याचा दावा कोमुनिदादने केला आहे.  


हेही वाचा