म्हापसा पोलिसांनी धडक कारवाई करत जप्त केला होता २० लाखांचा कोकेन
पणजी : म्हापसा पोलिसांनी कदंब बस स्थानकावर छापा टाकून दोघा युगांडन विद्यार्थ्यांकडून २० लाखांचा कोकेन जप्त केला होता. या प्रकरणी प्रथमदर्शनी परिस्थितीजन्य पुरावा असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने सेंतामू एल्वीज आणि उमर लुक्वागो या दोघा युगांडन विद्यार्थ्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. याबाबतचा आदेश म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश बॉस्को रॉबर्ट यांनी दिला आहे.
दोन विदेशी युवक पुण्याहून गोव्यात ड्रग्ज घेऊन येत असल्याची माहिती गुप्तहेरांनी म्हापसा पोलिसांना दिली होती. त्यानुसार, म्हापसा पोलिसाचे निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर, बाबलो परब, आदित्य गाड, मंगेश पाळणी व इतर पथकाने १६ ऑगस्ट रोजी रात्री कदंब बस स्थानकावर छापा टाकला. त्यावेळी पथकाने सेंतामू एल्वीज आणि उमर लुक्वागो या दोघा युगांडन विद्यार्थ्याना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यावेळी सेंतामू एल्वीज याच्याकडून पथकाने १०३ ग्रॅम कोकेन तर उमर लुक्वागो याच्याकडून १०२ ग्रॅम कोकेन जप्त केले होते. त्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किमत २०.५ लाख रुपये आहे. त्यानंतर पथकाने वरील दोघा युगांडन विद्यार्थ्यांवर अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम २१(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
दरम्यान दोघा संशयितांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज करून त्यांच्या विरोधात बनावट गुन्हा दाखल करत खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, जप्त केलेल्या ड्रग्जचा प्रथमदर्शनी अहवाल सकारात्मक आला असल्याचा दावा पोलिसांनी केला. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून दोघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले.