धूळ कमी करण्यासाठी उपाययोजना न केल्यास कारवाई
पणजी : पर्वरी उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळाली आहे. मात्र, या कामांमुळे लोकांना धुळीचा सामना करावा लागतो. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने धुळीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश जारी केले आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा मंडळाने दिला आहे, असे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी सांगितले.
पर्वरी राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दोन महिन्यांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. महामार्गाच्या मधोमध हे काम सुरू असून सर्व वाहतूक बाजूच्या सर्व्हिस रोडवरून वळवण्यात आली आहे. या कामांमुळे वाहतूक कोंडी तर होतेच शिवाय उत्खननाच्या कामांमुळे आजूबाजूच्या परिसरात धूळ उडते. लोकांना विशेषतः दुचाकीस्वारांना धुळीचा खूप त्रास होतो. या परिसराजवळ शाळा, शिक्षण विभागासह शासकीय कार्यालये असल्याने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची दखल घेत ठेकेदाराला धूळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी रस्ता सफाई कामगार आणि पाण्याची फवारणी करण्याच्या सूचना मंडळाने दिल्याचे महेश पाटील यांनी सांगितले.
सध्या पावसामुळे धुळीचे प्रमाण नियंत्रणात आहे. तथापि, रहदारी नसताना रात्रीच्या वेळी रस्त्यावर पाणी फवारणी करावी. साचलेली माती जवळच्या गटारांमध्ये टाकावी, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, या निर्देशाचे काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही, असे पाटील यांनी सांगितले.
समस्या दूर न झाल्यास कठोर कारवाई
धुळीची समस्या सोडवण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी एक प्रक्रिया राबवावी लागेल. चार-पाच दिवसांत पुन्हा पाहणी करू आणि समस्या दूर न झाल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा पाटील यांनी दिला.