ऑफलाईन गाड्या सोडण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश
फोंडा : कुळे येथील जागृत देवस्थान दूधसागर आजोबाला साकडे घालूनसुद्धा काही जीप मालक जबरदस्तीने पर्यटकांना घेऊन दूधसागर धबधब्यावर रवाना झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा ठेवून काही मोजक्याच जीप गाड्या सोडल्याने संतप्त लोकांनी जीप रोखून धरल्या. तणावाची स्थिती निर्माण झाल्याने माजी खासदार विनय तेंडुलकर व सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली. विनय तेंडुलकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर ऑफलाईन जीप गाड्या सोडण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. यावर तोडगा काढण्यासाठी मुखमंत्र्यांनी पुन्हा बैठक बोलविली आहे.
दूधसागर टूर ऑपरेटर संघटनेने शनिवारपासून मागणी पूर्ण झाली नसल्याने साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. परंतु, शुक्रवारी रात्री एका गटाने काही जीप मालकांच्या सहाय्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी दबाव आणला. जीप मालकांच्या काही सरकारी नोकर असलेल्या नातेवाईकांच्या बदल्या तसेच काही जणांना सरकारी नोकरी देण्याची आश्वासने देण्यात आली. त्यामुळे दबावाखाली येऊन काही मोजकेच जीप मालक पोलीस बंदोबस्तात गाड्या सोडण्यासाठी तयार झाले. सकाळ परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. धारबांदोडा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर, फोंडा पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक शिवराम वायंगणकर, कुळेचे निरीक्षक राघोबा कामत, फोंडा पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर, म्हार्दोळचे निरीक्षक योगेश सावंत व अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
दूधसागर टूर ऑपरेटर संघटनेतर्फे सर्व प्रथम दूधसागर आजोबाला आणि खुरसाला साकडे घालून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी कडक पोलीस बंदोबस्तात उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर यांनी पर्यटकांना घेऊन जीप गाड्या सोडण्याचा प्रयत्न केला. ५ जीप गाड्या धबधब्यावर रवाना झाल्यानंतर संतप्त जीप मालकांनी पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या गाड्या रोखून धरल्या. उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर व उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांनी जीप मालकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी माजी खासदार विनय तेंडुलकर व विलास देसाई यांनी जीप मालकांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी विनय तेंडुलकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यामुळे विनय तेंडुलकर यांच्याहस्ते जीप गाड्या ऑफ लाईन सोडण्यात सुरुवात करण्यात आली.
दूधसागर टूर ऑपरेटर संघटनेचे अध्यक्ष नीलेश वेळीप म्हणाले, संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे काही जीप मालकानी दबावाखाली येऊन हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न केला. तोडगा निघणार नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दरवर्षी दूधसागर धबधाब्यावर जीप गाड्या सोडण्यासाठी वन खाते दूधसागर टूर ऑपरेटर संघटनेकडे पत्रव्यवहार करीत होते. पण यावर्षी वन खात्याने कुळे पंचायतीकडे पत्रव्यवहार केल्याने जीप मालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात निवडून दिलेले लोकप्रतीनिधी व्यवसाय ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याने कुळे बाजारात संतापाची लाट पसरली आहे.
विनय तेंडुलकर यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न
कुळे येथील दूधसागर टूर ऑपेरेटर संघटना सुरू करण्यात तत्कालीन वन मंत्री विनय तेंडुलकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे दरवर्षी हंगाम सुरू करण्याच्या कार्यक्रमात विनय तेंडुलकर यांना आमंत्रण दिले जाते. यावर्षी सुद्धा जीप मालकांचा प्रश्न सोडविण्यासाठी विनय तेंडुलकर यांनी प्रयत्न केले. यामुळे सध्या सावर्डेचे राजकारण वेगळ्या दिशेने जात असल्याचे दिसून येते.