पणजी : गोव्यातील दिवाळी अंकांच्या परंपरेत स्वतःच्या वेगळेपणाची ठसठशीत मोहोर उमटवणाऱ्या दर्जेदार दिवाळी अंकाचे आज पर्वरी येथील मंत्रालयात डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी मंत्री नीळकंठ हळर्णकर, 'गोवन वार्ता'चे संपादक पांडुरंग गावकर, 'भांगरभूंय'चे संपादक महेश दिवेकर, मुख्य प्रतिनिधी सिद्धार्थ कांबळे आणि जाहिरात व्यवस्थापक अमित पोकळे उपस्थित होते.
यंदाच्या अंकात जयश्री देसाई व नमन धावस्कर यांच्या लेखणीतून साकारलेले 'सिंगल मदर'च्या संघर्षावर दोन विशेष लेख तुम्हाला अंतर्मुख करेल. याच विषयावर प्रसिद्ध चित्रकार सरदार जाधव यांनी मुखपृष्ठ रेखाटले आहे. सोबतच 'पालकत्व नको'अशी भूमिका घेणाऱ्यांविषयी तन्वी कामत बांबोळकर यांचा विशेष लेख तुमच्या विचारशक्तीला चालना देईल. गोव्यातील व कोकणातील जत्रांचा पौर्णिमा केरकर व शशिकांत तिरोडकर यांनी घेतलेला आढावा तुम्हाला त्या जत्रांची भ्रमंती घडवेल. गोव्याला पडलेल्या विविध गंभीर आजारांचा विळखा डॉक्टर प्रिया प्रभू व डॉक्टर जगदीश काकोडकर यांनी आपल्या लेखाद्वारे सोडवण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच तुमच्या आरोग्याविषयी असलेल्या शंकांचे निरसन करेल. सिनेसृष्टीतील लकाकणाऱ्या सोनेरी चंदेरी पडद्याच्या ग्लॅमर मागील भयाण वास्तवाचे दर्शन तुम्हाला 'कास्टिंग काऊच' या डॉ. अनमोल कोठाडिया यांच्या लेखाच्या माध्यमातून घडेल. जगातील युद्धांचा आढावा भावेश ब्राह्मणकर यांनी घेतला आहे.
याच सोबत यंदाच्या दिवाळी अंकात स्वतचा शोध घेण्यास उद्युत करणाऱ्या नऊ कथा तसेच १० मराठी कविता देखील तुमच्या दीमतीला हजर आहेत. याच सोबत गोवन वार्ताच्या दिवाळी अंकाने आपले वेगळेपण पुन्हा अधोरेखित करत राबवलेला अभिनव उपक्रमाद्वारे गोव्यातील कोकणी, हिंदी तसेच इंग्रजी कवींच्या मराठीत अनुवाद केलेल्या विशेष कवितांना स्थान दिले आहे.
गोवन वार्ताच्या दिवाळी अंकाने अल्पावधीतच आपल्या दर्जेदार आणि सकस साहित्याच्या आधारे जनमानसात आपली स्वतंत्र जागा निर्माण केली आहे. यंदाही समाजभिमुक अशा विविध विषयांनी नटलेला दिवाळी अंक वाचकांच्या हाती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. असा हा गोव्यासह जगभरातील विविध विषयांनी नटलेला, महाराष्ट्रातील मानाचा पुरस्कार मिळवण्याची परंपरा सुरु केलेला'गोवन वार्ता'चा दिवाळी अंक बाजारात उपलब्ध झाला आहे.