नात्याचं सेलिब्रेशन

तीन-चार सेशननंतर दोघांमध्ये पूर्वीसारखं नातं बहरू लागलं. घरातून सकारात्मक बदलाचा निरोप येताच पुढे दोन सेशन घेऊन डॉ. मितालीने ही थेरपी बंद केली.

Story: कथा |
27th October 2024, 05:17 am
नात्याचं सेलिब्रेशन

“हॅलो मॅम, दिशा आणि संदीप आजची अपॉइंटमेंट मागतात. काय करू? देऊ काय आजची अपाॅईंटमेंट? सगळ्या डेट्स फुल्ल आहेत आणि ऍडजेस्ट होईल अशी एकही वेळ दिसत नाही.”

“हम्म्म…” करत गळ्यातला स्टेथो नीट करत डॉ. मिताली म्हणाली, “एक काम कर, रात्री आठ नंतरची वेळ दे. पण फक्त पंधरा मिनिटे असं सांग.”

  “हो, हो तेही तसेच म्हणाले आहेत. सहज येणार आहेत. बरं, बरं कळवते तसं त्यांना .”

डॉ. मिताली मॅरेज कौन्सिलर म्हणून खूप फेमस होती. मितालीकडे संदीप आणि दिशा गेली सहा महिने थेरपीसाठी येत होते. आता त्यांची सेशन बंद झाली होती.

डाॅ. मितालीने त्यांची केस स्टडी वाचली. 

संदीप व दिशा दोघेही नोकरी करणारे. संदीप ‘एम.एम.सी.’च्या बँकेत कॅशियरच्या पोस्टवर होता, तर दिशा मार्केटिंगमध्ये एम.ए. केलेली. एका नामांकित कंपनीत सिनियर पोस्टवर कामाला होती. दोघांच्या वयात चार पाच वर्षांचं अंतर होतं. दोघेही महत्त्वकांक्षी असले, तरी नाती जपण्याची आणि घर संसाराची आवड या एकमताने विवाह बंधनात अडकले. सुरुवातीचे नव्याचे नऊ दिवस फार नव्हाळीत गेले. त्याआधीच्या दोन महिन्यात झालेल्या आठ दहा भेटीत दिशाला संदीप जणू काही स्वप्नाचा राजकुमार आपल्यासाठी प्रत्यक्षात उभा आहे असं वाटायचं. तो खऱ्याखुऱ्या आयुष्यात जोडीदार म्हणून मिळालाय त्याच विचारात असायची. पांढऱ्या घोड्यावरून येणारा राजकुमार म्हणजे संदीप तिला तसाच जपायचा अगदी परिसारखा.

संदीप त्यांचे आई- बाबा, काका, बहीण अशा एकत्र कुटुंबात वाढलेला मुलगा. काकूच्या अकाली जाण्याने काकांचा संसारातला रस नाहीसा झाला होता. जप, ध्यान करण्यात आणि ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ यासाठी करावी लागणारी क्लार्कची नोकरी. पदरी मुलगी असूनही बाबाचे नाव लावण्यापलीकडे ‘कर्तव्य’ त्यांचे नव्हतं. त्यामुळे संदीपच्या आई बाबांनी काकाच्या मुलीवर म्हणजेच दीप्तीवर पोटच्या मुलीसारखी माया केलेली. संदीपबरोबर तिचेही लाड पुरवलेले. हट्ट पूर्ण केलेले. सख्खी बहीण भाऊ अशी संदीप आणि दीप्ती. चार वर्षे लहान असलेली दीप्ती बावीसाव्या वर्षी लग्न करून सासरी सुखात नांदत होती.

संदीपचे शिक्षण पूर्ण होताच नोकरीचं बस्तान बसल्यावर घरात लग्नाची बोलणी सुरु झाली. अठ्ठावीस वर्षीय संदीप दिसायला राजाबिंडा. कोणालाही आवडेल असा स्वभाव. मिळून-मिसळून राहणारा, बोलण्यात मार्दव व चेहऱ्यावर नम्रता असायची. अशा संदीपचे स्थळ आल्यावर दिशाच्या घरी आनंदाचे कारंजे फुलले. यथावकाश एकत्र कुटुंबात वाढलेली दिशा लग्न होऊन संदीपची अर्धांगिनी होत परत एकत्र कुटुंबात गृहलक्ष्मी म्हणून प्रवेश करती झाली. 

हसतं खेळतं एकत्र कुटुंब. दिशा ‘सूनपण’ मिरवत असायची. सकाळच्या ऑफीसच्या घाईगडबडीत दिशाला सासूबाईंच्या हातचा स्वादिष्ट चवीचा टिफिन व नाष्टा आयता मिळायचा. जसं तिच्या आईच्या घरी वातावरण, तसेच सासरी होते. संदीपला दिशा कधीतरी म्हणायची, “मी फक्त मुलगी नसून सून आहे हाच नात्यात झालेला बदल. कु. दिशा ऐवजी सौ. दिशा बदल झालाय एवढंच. प्रेम, माया सगळं कसं माहेरच्या सारखं मिळतं. किती भाग्यवान आहे ना मी?”

असे दिवसा मागून दिवस जात होते. संदीप आणि दिशाच्या संसार वेलीवर श्रुती आणि सार्थक अशी दोन गोंडस फुले उमलली. संसारवेल प्रेमाने मायने बहरत होता. कुटुंब, नाती, सण-समारंभ, ऑफिस या कुंपणातही एकमेकांच्या साथीने संसारवेल ऐटीत वरवर चढत होती.

एवढ्यात काय बिनसले कोणास ठाऊक! दिशा व संदीपमध्ये कुरबुरी सुरू झाल्या. दृष्ट लागावी असं असलेल्या नात्यात शाब्दिक चकमकी होऊ लागल्या. ऑफिसची वाढती कामे, जास्त वेळ करावं लागणार काम हेही त्यासाठी कारण होतं. वेळ कमी पडत असल्यामुळे आपसुकच बोलणं कमी कमी होत गेलं.  जबाबदाऱ्यांचं ओझंही वाढत होतं. यातूनच ‘तूच कर, मी नाही’ अशी तू तू मैं मैं, चकमकी वारंवार होऊ लागल्या. सुरुवातीला नवरा बायकोमध्ये असलेले वाद त्यांचे ते सोडवतील म्हणून सासरची मंडळी दुर्लक्ष करू लागली. पण जेव्हा मुलांसमोर त्यांचा शाब्दिक तोल ढळू लागला तेव्हा मात्र संदीप आणि दिशाच्या आई बाबांनी आपापसांत बोलून एक निर्णय घेतला.

एका रविवारी चौघांनी संदीप व दिशाला समोर बसून त्यांचा निर्णय वजा सल्ला दिला तो म्हणजे तुम्ही दोघांनी डॉक्टर मितालीला जाऊन भेटावे. दोघांनाही समजत होते पण या गोष्टींत डॉक्टर मिताली काय करणार? असा प्रश्न एकमेकांना न विचारता गप्प होते. आई बाबांनी विषय काढल्यावर संदीप व दिशाने डॉ. मितालीकडे जायचे ठरवले. आई बाबाही पूर्ण तयारीनिशी आले होते. त्यांनी लगेचच डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. संदीप व दिशा डॉक्टर मितालीला भेटायला जाताना गप्प होते. अर्ध्या तासाच्या प्रवासात डॉक्टरशी काय बोलावं? काय उत्तर द्यावे? यावरही चर्चा झाली नव्हती. दोघंही परत वाद नको म्हणून गप्प राहून प्रवास करत होते.

क्लिनिकला पोचल्यावर डॉ.मितालीने त्यांना बोलावले. त्यांच्या चेहऱ्यावरून डॉ. मितालीने ओळखले. दोघांचे स्वागत करून त्यांना आवडणारे गुलाबजामुनचा ट्रे त्यांच्यासमोर ठेवला. “गुलाबजामसारखा गोडवा आपल्या सेशनमधून तुम्हाला नक्कीच मिळेल.” असं सूचक बोलत काही जुजबी प्रश्न विचारून तासाभरात त्यांचं पहिलं सेशन संपवलं. कामाची पद्धत समजावून सांगितली आणि पुढची अपॉइंटमेंट घेऊन संदीप व दिशा घरी परतले.

तीन-चार सेशननंतर दोघांमध्ये पूर्वीसारखं नातं बहरू लागलं. घरातून सकारात्मक बदलाचा निरोप येताच पुढे दोन सेशन घेऊन डॉ. मितालीने ही थेरपी बंद केली. संदीप व दिशाच्या नात्यात असणारा अडसर मोबाईल होता. मोबाईलवर दिला जाणारा वेळ, घरूनही कामाच्या संदर्भात चालणारे फोन आणि इमेल्स. दिशाचं प्रमोशन ड्यू असल्याने वाढलेला कामाचा व्याप व त्यामुळे कमी होत गेलेलं बोलणं. वाढलेल्या अपेक्षा, गृहीत धरलेली कामं यातूनच शाब्दिक चकमकी होत होत्या. “मी का सांगू? तुला समजायला हवं!” हा गृहीत धरलेला विचार. डॉ. मितालीने सेशनमार्फत दोघांचाही इगो हार्ट न करता असलेला हा अडसर दूर केला होता. दिशा व संदीप पुन्हा प्रेम वेलीवर बागडू लागले होते.

आज डॉक्टर मितालीला भेट देण्यासाठी संदीप व दिशाकडे कारणही तसंच गोड होतं. ते म्हणजे दिशाचं प्रमोशन. “मे आय कम इन?” असं म्हणत दिशाने गुलाबजाम डॉ. मितालीच्या हातात देऊन म्हटले “सुरुवातीचे गुलाबजाम एवढे छान होते की जीवनाचा अविभाज्य घटक बनले. छोट्या छोट्या सेलिब्रेशनसाठी तुमचे गुलाबजाम पंगतीत असतात. आम्ही तर म्हणतो ‘मिताली’ज गुलाबजामुन. थँक्यू वन्स अगेन...” म्हणत त्रिकुट गप्पांत रंगलं.

रिशेप्सनिस्टने “मॅम, मी घरी जाऊ का नऊ वाजलेत” असं विचारल्यावर हास्यकल्लोळात रंगलेली त्रिकूट घरी जायला निघालं.


मंजिरी वाटवे