हार्दिकची विस्फोटक खेळी; टीम इंडियाची विजयी सुरुवात

बांगलादेशचा सात गड्यांनी धुव्वा : मालिकेत १-० आघाडी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
07th October, 12:24 am
हार्दिकची विस्फोटक खेळी; टीम इंडियाची विजयी सुरुवात

ग्वाल्हेर : हार्दिक पंड्याची नाबाद विस्फोटक खेळी आणि संजू सॅमसन-कर्णधार सूर्यकुमार या जोडीच्या प्रत्येकी २९ धावांच्या मदतीने भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. ग्वाल्हेरमधील न्यू माधवराव शिंदे क्रिकेट स्टेडियममध्ये बांगलादेशने पहिल्या टी-२० सामन्यात भारताला विजयासाठी १२८ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने सहज पूर्ण करत धमाकेदार विजय संपादित केला. टीम इंडियाने ११.५ षटकांमध्ये ३ विकेट्स गमावून १३२ धावा केल्या. टीम इंडियाने या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशा फरकाने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बांगलादेश संघाने भारतासमोर १२८ धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय संघासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने १४ चेंडूत २९ धावा केल्या आणि संजू सॅमसनने १९ चेंडूत २९ धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने तुफानी फटकेबाजी करत १६ चेंडूत नाबाद ३९ धावा कुटल्या. आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या नितीश कुमार रेड्डीने १५ चेंडूत नाबाद १६ धावा केल्या. मुस्तफिजुर रहमान आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी १ यश मिळाले.
भारतीय गोलंदाजांनी गाजवले वर्चस्व
यजमान भारतीय संघाने पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आमंत्रण दिले होते. यावेळ भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले. बांगलादेशने पहिल्या षटकात ५ धावांत एक विकेट गमावली. अर्शदीप सिंगने लिटन दासला आपला शिकार बनवले. यानंतर बांगलादेशला १४ धावांवर दुसरा धक्का बसला. अर्शदीप सिंगने परवेझ हुसैन इमॉनला क्लीन बोल्ड केले. यानंतर बांगलादेश संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला आणि त्यांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली नाही. अशाप्रकारे पाहुण्या संघाला केवळ १२७ धावा करता आल्या.
संघाकडून मेहदी हसन मिराजने सर्वाधिक नाबाद ३५ धावा केल्या आणि कर्णधार नजमुल हुसेन शांतोने २७ धावा केल्या. संपूर्ण सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपला दबदबा कायम ठेवला. संघाकडून फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३-३ बळी घेतले. हार्दिक पांड्या, मयंक यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी १-१ विकेट घेतली.

पदार्पणात मयंक यादवचा अनोखा कारनामा

टी-२० मध्ये पदार्पणात निर्धाव षटक टाकणारा भारतीय गोलंदाज म्हणून मयंक यादवनेही प्रवेश केला आहे. पदार्पण करताना टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात निर्धाव षटक टाकणारा अजित आगरकर हा भारताचा पहिला गोलंदाज होता. त्याने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केले आणि पहिल्या षटकात एकही धाव दिली नाही. यानंतर, २०२२ मध्ये अर्शदीपने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या पहिल्या षटकात एकही धाव दिली नाही. त्याने इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले. आता या यादीत मयंक यादवचा समाविष्ट झाला आहे. त्याने ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि पहिलेच षटक निर्धाव टाकले आहे. दरम्यान, मयंकने या सामन्यात शानदार कामगिरी करताना आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली विकेटही आपल्या नावे केली आहे.
.........
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : १९.५ षटकांत सर्वबाद १२७ धावा
भारत : ११.५ षटकांत ३ बाद १३२ धावा.
सामनावीर : अर्शदीप सिंग      

हेही वाचा