अमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई
पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) हडफडे येथील सेंट जोसेफ हायस्कूल परिसरात असलेल्या बस स्टॉप जवळ छापा टाकून प्रॉमिस उमेह या कॅमेरोनियन नागरिकाला अटक केली. त्याच्याकडून ९० हजार रुपये किमतीचा ५०० ग्रॅम गांजा, ५० ग्रॅम चरस,१.५ कोकेन आणि १ ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आला आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, नागोवा - हडफडे येथील सेंट जोसेफ हायस्कूल परिसरात एक विदेशी युवक ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षक अक्षत कौशल आणि उपअधीक्षक नेर्लोन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजिंत पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सुनील फालकर, साहाय्यक उपनिरीक्षक वासूदेव नाईक, हवालदार प्रमोद कळंगुटकर, काँन्स्टेबल राहूल गावस, विशाल शितोळे, कुदन पटेकर व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरुवार ३ रोजी मध्यरात्री १२.१५ ते पहाटे सायंकाळी ५.१५ दरम्यान वरील ठिकाणी सापळा रचला.
याच दरम्यान गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विदेशी युवक त्या ठिकाणी आला असता, त्याची चौकशी केली. त्यावेळी पथकाने प्रॉमिस उमेह या विदेशी नागरिकाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून ९० हजार रुपये किमतीचा ५०० ग्रॅम गांजा, ५० ग्रॅम चरस, १.५ कोकेन आणि १ ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त केले. या प्रकरणी उपनिरीक्षक सुनिल फालकर यांनी उमेह याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम २०(बी) (ii) (ए), २१(ए) आणि २२(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याला शुक्रवार ४ रोजी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची एएनसीची कोठडी ठोठावली आहे.