उमेदवारांना ६ हजार क्रमांकापुढील अर्जांचे वितरण
पणजी : राज्य मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे भरती करण्यात येणाऱ्या ९४४ जागांसाठी अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातील अर्ज क्रमांक १ ते ६००० गायब झाले आहेत. उमेदवारांना ६ हजार क्रमांकापुढील अर्ज दिले जात असल्याने या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी केला.
पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी महामंडळाचा निवेदन देऊन भरती प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करण्याची मागणी केली. यावेळी रोहन नाईक, सलमान खान चेतन कामत आदी उपस्थित होते.
पालेकर यांनी सांगितले की, आमच्या शिष्टमंडळाने महामंडळाला भेट दिली असता येथे कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. आम्ही अर्ज घेतले असता त्यावर १४ हजारच्या पुढील क्रमांकावर आहे.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अर्ज क्रमांक एक ते सहा हजार गायब झाले आहेत. हे अर्ज कुठे गेले याविषयी उपस्थित अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. हे गायब अर्ज आमदारांमध्ये वाटण्यात आलेत का याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. भरती प्रक्रियेचे नाटक करून सरकारने बेरोजगारांची थट्टा केली आहे.
रोहन नाईक म्हणाले की, अर्जाचे शुल्क पन्नास रुपये आहे. मात्र येथे ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध नाही. पन्नास रुपये रोख घेऊनच अर्ज दिले जातात. त्याची पावती देखील दिली जात नाही. एकीकडे सरकार डिजिटल होण्याच्या गोष्टी करते आणि दुसरीकडे रोख रक्कम मागितली जाते.
अर्ज प्रक्रियेतील घोटाळा समजू नये यासाठीच ऑनलाइन प्रक्रिया केली नसावी. आम्ही ही सर्व भरती प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करून ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
भरती प्रक्रियेत कसलाही घोटाळा नाही - रुडॉल्फ फर्नांडिस
दरम्यान मनुष्यबळ विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी सांगितले की, अमित पालेकर खोटे बोलत आहेत. मंडळाच्या भरती प्रक्रियेत कसलाही घोटाळा झालेला नाही. सर्व प्रक्रिया नियमानुसार सुरू आहे. भरती प्रक्रिया खात्यातर्फे केली जाते. यामध्ये आपण कोणताही हस्तक्षेप करत नाही.