गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान ओढवले विघ्न; मणेरी रेसिडेन्सीच्या गोवा स्थित मालकावर दखलपात्र गुन्हा नोंद
मणेरी-दोडामार्ग : येथे गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान सर्वांच्या उत्साहावर पाणी फेरणारी घटना घडली आहे. येथे पाच दिवसांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मुलाने अनावधानाने एका इमारतीच्या गेटला हात लावल्याने त्यास विजेचा जबर धक्का बसला. मदतीसाठी आरडाओरडा केल्याने इतरांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. दरम्यान त्याच्या वडिलांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही विजेचा धक्का बसला. सदर ठिकाणी धोक्याची सूचना देणारा फलकही कुठे आढळून आला नाही. याप्रकरणी सदर इमारतीच्या मालकावर दोडामार्ग पोलीस स्थानकांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार; कुबलवाडी-मणेरी येथील ग्रामस्थ बुधवारी सायंकाळी गणपती विसर्जन सोहळ्यात सामील झाले होते. मिरवणूकीत उत्साहाचे वातावरण होते, दरम्यान गावातून मिरवणूक पुढे जात मणेरी रेसिडेन्सी या इमारतीजवळ पोहोचली. मिरवणूकीत सहभागी झालेला सोहम बाजूला गेला व या इमारतीच्या गेटपाशी उभा राहीला. दरम्यान अनावधानाने त्याचा हात इमारतीच्या गेटला लागून त्यास जबर धक्का बसला. जिवाच्या आकांताने मदतीसाठी हाक देणाऱ्या सोहमला वाचवण्यासाठी त्यांचे वडील संजय कुबल पुढे सरसावले व त्यांनाही धक्का बसला व दोघेही जमिनीवर कोसळले. उपस्थित ग्रामस्थांनी त्या दोघांना तत्काळ दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दोडामार्ग पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान ग्रामपंचायत सदस्यांनी सदर इमारतीच्या मालकाशी संपर्क साधला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व तुम्ही तिकडे का गेलात ? असा उर्मट प्रश्न केला. इमारतीच्या मालकाच्या अशा वागण्याने ग्रामस्थ संतापले. त्यांनी मणेरी रेसिडेन्सीच्या गोवा स्थित मालकावर मालकाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला आहे.