येत्या २ ऑक्टोबरपासून कुत्र्यांच्या गणनेस सुरुवात!

हिंस्र जातीच्या पाळीव कुत्र्यांचा आकडा येणार समोर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th September, 12:26 am
येत्या २ ऑक्टोबरपासून कुत्र्यांच्या गणनेस सुरुवात!

पणजी : राज्यात येत्या २ ऑक्टोबरपासून भटक्या आणि पाळीव कुत्र्यांच्या गणनेस सुरुवात होणार आहे. या गणनेमुळे रॉटविलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमन आदींसारख्या हिंस्र पाळीव कुत्र्यांचा आकडा समोर येण्यास मदत होणार असल्याची माहिती पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक यांनी बुधवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
काहीच दिवसांपूर्वी हणजूण येथे एका सात वर्षीय मुलावर पिटबुल जातीच्या पाळीव हिंस्र कुत्र्याने हल्ला केला. त्यात संबंधित मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ताळगावमध्ये दोघा भावंडावर रॉटविलर कुत्र्याने हल्ला केला होता. याशिवाय शिवोली, कामुर्ली, दोनापावला परिसरांतही अशाप्रकारच्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पाळीव हिंस्र कुत्र्यांकडून नागरिकांवर प्राणघातक हल्ले होत आहे. परंतु, अशा जातीची पाळीव कुत्री राज्यात किती आहेत, याची आकडेवारी पशुपालन व पशुसंवर्धन खात्याकडे उपलब्ध नाही. २०१९ मध्ये झालेल्या कुत्र्यांच्या गणनेतून भटकी आणि पाळीव कुत्र्यांचा आकडा समोर आला होता. आता येत्या २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गणनेतून पाळीव हिंस्र कुत्र्यांचा नेमका आकडा समोर येणार असल्याचे डॉ. नाईक यांनी नमूद केले.
गणनेनंतर हिंस्र कुत्र्यांवर नियंत्रण शक्य
- हिंस्र जातीच्या २३ प्रकारच्या कुत्र्यांवर बंदी घालण्याचा निर्णय काहीच महिन्यांपूर्वी घेतलेला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही अशा प्रकारच्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ले केल्यास त्याला पूर्णपणे कुत्र्याचा मालक जबाबदार राहील. मालकाकडून त्याबाबतचे प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले जाईल, असे स्पष्ट केले आहे.
- याबाबतचा आदेश पुढील काहीच दिवसांत जारी करण्यात येणार असल्याची माहिती पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.